आईचे पत्र हरवले.. लगोरी.. आंधळी कोशिंबीर हरवलेल्या, जगलेल्या खेळात रमले पालक.. पाल्यांवरही नवा मोहोर

पलाश ब्लूम्स’चा क्रीडा महोत्सव पारंपरिक मराठी खेळांच्या रंगात

रत्नागिरी : सध्याच्या धावपळीच्या बैठ्या आणि मोबाईलच्या काचपडद्यावर बंदिस्त होत चाललेल्या आयुष्यात पालक आणि पाल्य यांना ‘पलाश ब्लूम्स’च्या वार्षिक क्रीडा महोत्सवाने पुन्हा एकदा थेट मैदानावर आणले. शिवरुद्र टर्फच्या प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्याने हरवलेल्या काळाची दारे किलकिली केली. बालपणी जगलेल्या पण काळाच्या ओघात मागे पडलेल्या ‘आईचे पत्र हरवले’, ‘लगोरी’, ‘आंधळी कोशिंबीर’ आणि ‘पालक-पाल्य रिले’ यासारख्या माय-मराठी खेळांमध्ये पालक आपल्या चिमुकल्यांसह मनमुराद रमले; तर पाल्यांना या पारंपरिक खेळांची ओळख घडली..मोहोर उमटली
या क्रीडा महोत्सवाने पालकांना आपल्या सुवर्ण बालपणाच्या पाऊलखुणांवर पुन्हा चालण्याची संधी दिली, तर त्यातील निखळ आनंद, संस्कार आणि नात्यांची ऊब नव्या पिढीच्या हाती सुपूर्द करण्याचे मोलाचे काम केले.
नेहमीच्या धावण्याच्या शर्यती आणि औपचारिक स्पर्धांची चौकट मोडून ‘पलाश ब्लूम्स’ने यंदा पारंपरिक मराठी खेळांची संवेदनशील संकल्पना राबवली. केवळ मुलांचा स्पोर्ट्स डे न ठेवता आई-वडिलांनाही मैदानात उतरवून हा सोहळा संपूर्ण कुटुंबाचा स्नेहमेळावा आणि आनंदाचा उत्सव बनवला.
आपल्या लहानपणी खेळलेले खेळ पाल्यांसोबत रंगवताना पालकांच्या डोळ्यांत चमकणारे जुन्या आठवणींचे कवडसे आणि चेहऱ्यावर उमटणारे निरागस हास्य मैदानाचा प्राण ठरले. त्याला जिवंत करुन गेले. दुसरीकडे, आभासी जगाच्या वलयाबाहेर पडून प्रत्यक्ष मातीशी आणि खेळाशी नाते जोडताना पाल्यांसाठी हे खेळ एक नवे, स्पर्शक्षम आणि आनंददायी विश्व ठरले.
महोत्सवाची नांदी विद्यार्थी आणि पालकांच्या जोशपूर्ण झुंबा नृत्याने झाली. मुलांच्या खांद्याला खांदा लावून आई-वडिलांनीही तालावर ठेका धरत संपूर्ण आवार उत्साहाने भारून टाकले. झुंबामुळे मुलांच्या शारीरिक तंदुरुस्तीसोबतच लयबद्ध हालचाली आणि समन्वयाला चालना मिळाली. यानंतर रंगलेल्या विविध खेळांनी मैदानावर उत्साहाची लाट उसळली:
पालक-मूल रिले: आई-वडील आणि मूल यांच्या एकत्रित संघामुळे मुलांमध्ये संघभावना, परस्पर सहकार्य आणि समन्वयाची भावना बळावली.
लगोरी: वडील आणि मुलांच्या जोडीने रंगलेल्या या अस्सल मराठी खेळाने बालकांची चपळता, एकाग्रता, अचूक लक्ष्य साधण्याची क्षमता आणि सांघिक भावना फुलवली.
आईचं पत्र हरवलं: आई आणि मुलांच्या सहभागातून रंगलेल्या या खेळाने निरीक्षणशक्ती, सतर्कता आणि स्मरणशक्तीला चालना देत नात्यातील जवळीक वाढवली.
आंधळी कोशिंबीर: आई-वडील आणि मुलांच्या एकत्रित सहभागातून ऐकण्याची क्षमता, प्रसंगावधान, ताळमेळ आणि एकमेकांवरील विश्वासाचे महत्त्व अधोरेखित झाले.
या सर्व खेळांमधून मुलांना केवळ शारीरिक कसरतीचा लाभ झाला नाही, तर आत्मविश्वास, निर्णयक्षमता, सहकार्य, नियमांचे पालन आणि खिलाडूवृत्ती यांसारखे आयुष्य घडवणारे संस्कारही सहजगत्या मिळाले.
शाळा ही केवळ पुस्तकी पानांची आणि गुणांच्या स्पर्धेची जागा न राहता मुलांचे बालपण आनंदी, समृद्ध आणि संस्कारक्षम करणारे व्यासपीठ आहे, हे ‘पलाश ब्लूम्स’ने या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या सांगतेप्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मान्यवरांचे सामूहिक छायाचित्र टिपण्यात आले; त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
मोबाईलच्या चौकटीबाहेर पडत ‘खेळातून शिक्षण, खेळातून संस्कार आणि खेळातून नात्यांमधील गोडवा’ जपणारा हा क्रीडा महोत्सव पालकांसाठी जुन्या आठवणींचा अनमोल ठेवा आणि पाल्यांसाठी हरवलेल्या खेळांची नव्याने उमटलेली मोहोर ठरला.