रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले पुरुष आणि पहिली महिला म्हणून HYROX स्पर्धा पूर्ण करण्याचा मान; मर्यादित साधनसामग्रीत अवघ्या ४५ दिवसांच्या तयारीत मिळवले यश
रत्नागिरी : जागतिक स्तरावर अत्यंत आव्हानात्मक फिटनेस स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या HYROX इंटरनॅशनल स्पर्धेत रत्नागिरीच्या खेळाडूंनी आपली छाप उमटवली आहे. गुजरातमध्ये यावर्षी प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि गणपतीपुळे अल्ट्राचे आयोजक प्रसाद देवस्थळी आणि ‘फिटनेस मंत्रा’च्या संचालिका तसेच देशपातळीवरील प्रसिद्ध झुंबा प्रशिक्षक अंकिता प्रभू-पाटकर यांनी यशस्वीरीत्या स्पर्धा पूर्ण केली. प्रसाद यांनी २ तास १९ मिनिटे, तर अंकिता यांनी २ तास ३६ मिनिटे इतक्या वेळेत स्पर्धा पूर्ण केली.
विशेष म्हणजे, कोकणात उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनसामग्रीच्या आधारे HYROX स्पर्धा पूर्ण करणारे प्रसाद देवस्थळी हे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले पुरुष, तर अंकिता प्रभू-पाटकर या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे रत्नागिरीच्या क्रीडा आणि फिटनेस क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे.
HYROX स्पर्धेसाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणे रत्नागिरीमध्ये उपलब्ध नाहीत. एकाच जिममध्ये सर्व उपकरणे मिळणेही शक्य नव्हते. त्यामुळे AIM Fitness Gym आणि ReFit Gym येथे समन्वय साधून दोघांनी सराव केला. रझीन (ReFit Gym) आणि अमोल जाधव (AIM Fitness) यांनी या तयारीसाठी मोलाचे सहकार्य केले. या दोघांचेही त्यांनी विशेष आभार मानले.
या अनुभवाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, “कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमधून आम्हाला धावण्याची प्रेरणा आधीच मिळाली होती. त्यामुळे धावण्याचा भाग आमच्यासाठी तुलनेने सोपा होता. खरे आव्हान होते ते वेगवेगळे वर्कआउट्स पूर्ण करण्याचे. त्यासाठी लागणारी उपकरणे उपलब्ध करून घेणे, उपलब्ध उपकरणे आणि HYROX मधील उपकरणांमधील फरक समजून घेणे, ही मोठी आव्हाने होती. तरीही उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून आम्ही हे आव्हान पूर्ण केले. कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या प्रॅक्टिस रनचाही आम्हाला खूप फायदा झाला.”
ते पुढे म्हणाले, “कोकणात HYROX साठी लागणारी सर्व उपकरणे उपलब्ध झाल्यानंतरच अशा स्पर्धांचा विचार करू, अशी मानसिकता ठेवण्याची गरज नाही. कोकणी माणसाच्या अंगातच मेहनत करण्याची आणि आव्हान स्वीकारण्याची ताकद आहे. कोकणातील महिला आणि पुरुषांनी अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये नक्की सहभागी व्हावे. सुरुवात करण्यासाठी सर्व गोष्टी परिपूर्ण असण्याची वाट पाहू नका.”
HYROX मधून व्यवस्थापनाचेही धडे!
या स्पर्धेच्या निमित्ताने आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे दोघांनी लक्ष वेधले. अवघ्या दीड ते दोन एकर परिसरात हजारो खेळाडू वेगवेगळे टास्क पूर्ण करत असताना कुठेही गोंधळ किंवा एकमेकांच्या कामात अडथळा निर्माण होत नाही. प्रत्येक खेळाडू आपापले टास्क व्यवस्थित पूर्ण करतो. इतक्या मोठ्या स्पर्धेचे नियोजन आणि व्यवस्थापन कशा पद्धतीने केले जाते, हे प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. केवळ फिटनेसच नव्हे, तर इव्हेंट मॅनेजमेंटच्या दृष्टीनेही HYROX मधून खूप काही शिकायला मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
या यशानंतर रत्नागिरी आणि कोकणातील अधिकाधिक खेळाडूंनी HYROX सारख्या फिटनेस स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आगामी काळात देशभरात होणाऱ्या अशा स्पर्धांमध्ये रत्नागिरीचे आणखी खेळाडू सहभागी होतील आणि राष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीचा ठसा उमटवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि गणपतीपुळे अल्ट्रामध्ये सहभागी होण्याचे आवाहन
यावेळी त्यांनी कोकणातील तसेच राज्यभरातील धावपटूंना आगामी स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
३ जानेवारी २०२७ रोजी रत्नागिरी येथे चौथ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ५ किमी, १० किमी आणि २१ किमी अशा तीन अंतरांच्या शर्यती होणार आहेत.
तसेच २८ मार्च २०२७ रोजी गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये २८ किमी, ४२ किमी आणि ५६ किमी अशा अंतरांची आव्हाने धावपटूंसाठी उपलब्ध असणार आहेत.
कोकणचा निसर्ग, समुद्रकिनारे आणि निसर्गरम्य रस्त्यांवर धावण्याचा अनुभव घेण्यासाठी तसेच स्वतःच्या फिटनेसला नवे आव्हान देण्यासाठी जास्तीत जास्त धावपटूंनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रसाद देवस्थळी आणि अंकिता प्रभू-पाटकर यांच्या या कामगिरीचे रत्नागिरीतील क्रीडा, फिटनेस आणि सामाजिक क्षेत्रातून कौतुक होत असून, दोघांचेही सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.













