शिरोडा येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद : ३० रक्तदात्यांचे रक्तदान..

जिल्हा परिषद सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते झाले शिबिराचे उद्घाटन..

वेंगुर्ले : प्रतिनिधी
कै. नितीन परब यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त शिरोडा येथे उपजिल्हा रुग्णालय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ३० जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

कै.नितीन परब यांच्या पत्नी श्रीमती निकिता नितीन परब, ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना, गांधी चौक शिरोडा आणि मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हे रक्तदान शिबिर संपन्न झाले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. शेटकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निकिता परब, योगेश प्रभू, बाबल गावडे, शिरोडा गांधी चौक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संजय भानजी, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य तृप्ती परब, माजी सरपंच मनोज उगवेकर, माजी उपसरपंच राहुल गावडे, नंदू परब आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, सदस्य तसेच परिसरातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कै. नितीन परब यांच्या स्मृती जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच श्रेष्ठदान’ हा संदेश देत ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात आपले योगदान दिले.