तेरवण-मेढे येथील अवैध माती उत्खनन प्रकरणी महसूल विभागाची धडक कारवाई; ९५ ब्रास उत्खननापोटी सुमारे ५ लाखांचा दंड

​बांदा-दोडामार्ग मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणारा डंपरही पकडला; १ लाख १३ हजारांचा दंड वसूल

​दोडामार्ग : सुहास देसाई

तेरवण-मेढे येथील श्री नागनाथ मंदिरासमोर पोकलेनच्या साहाय्याने सुरू असलेल्या अवैध माती उत्खनन आणि वाहतुकीवर दोडामार्ग महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी घटनास्थळावरून दोन डंपर ताब्यात घेण्यात आले असून, पंचनाम्यात ९५ ब्रास मातीचे अवैध उत्खनन आणि ३० ब्रास मातीचा साठा आढळून आला आहे. याप्रकरणी संबंधितांना सुमारे ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याची माहिती नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी दिली. तसेच, बांदा-दोडामार्ग मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करत १ लाख १३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

​दोडामार्ग तालुक्यातील विविध गावांमध्ये दिल्ली, हरियाणा आणि गोवा येथील बड्या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या आहेत. या ठिकाणी नियमबाह्य वृक्षतोड, उत्खनन आणि फार्म हाऊसची बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून तेरवण-मेढे येथील नागनाथ मंदिरासमोर पोकलेन मशीन लावून शेकडो ब्रास मातीचे उत्खनन केले जात होते. ही माती डंपरद्वारे पाळये येथील एका फार्म हाऊसच्या ठिकाणी नेली जात असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाली होती.

​या माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकून माती भरलेला आणि माती भरत असलेला असे दोन डंपर ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा केले. नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी या कारवाईबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, तेरवण-मेढे येथील उत्खननाचे मोजमाप केले असता ९५ ब्रास मातीचे उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाले, तर जागेवर ३० ब्रास मातीचा साठा आढळून आला आहे. या प्रकरणी संबंधितांना साधारण ५ लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार असून, ताब्यात घेतलेल्या दोन्ही डंपरवरील पुढील दंडात्मक कारवाईसाठी प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.

​वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर मध्यरात्री कारवाई
दरम्यान, महसूल विभागाने अवैध वाळू वाहतुकीविरोधातही कडक पावले उचलली आहेत. परवा रात्री उशिरा १ वाजण्याच्या सुमारास बांदा-दोडामार्ग रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारा एक डंपर तहसीलदारांच्या पथकाने पकडला. या प्रकरणी संबंधित वाहनमालकावर कारवाई करत १ लाख १३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

​परप्रांतीय लॉबीवर कारवाईची मागणी
तालुक्यात काही दिल्ली व परप्रांतीय लॉबीकडून अवैध उत्खनन आणि बांधकामे सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. तेरवण-मेढे येथील प्रकरणातही दंडाची रक्कम कमी करण्यासाठी काही जणांकडून दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, महसूल विभागाने केलेल्या या कठोर कारवाईमुळे अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.