आगामी वर्षात एकपात्री स्पर्धा, अभिनय प्रशिक्षण व संगीत नाट्यप्रवेश स्पर्धेचे आयोजन

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा रत्नागिरीची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे शाखेचे अध्यक्ष श्री. समीर इंदुलकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला वर्षभरात दिवंगत झालेल्या रंगकर्मींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर विषयपत्रिकेनुसार कामकाजाला सुरुवात झाली असून शाखेचे प्रमुख कार्यवाह श्री. वामन कदम यांनी वाचून दाखवलेल्या गतवर्षीच्या इतिवृत्ताला तसेच खजिनदार श्री. सतीश दळी यांनी मांडलेल्या जमा-खर्चाला आणि पुढील वर्षाकरिता लेखापरीक्षकांच्या नेमणुकीला सविस्तर चर्चेनंतर सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

यावेळी अध्यक्ष श्री. समीर इंदुलकर यांनी शाखेने वर्षभरात राबवलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये मराठी अभिवाचन स्पर्धा, एकांकिका स्पर्धा तसेच मध्यवर्ती मुंबईचे विश्वस्त मा. ना. डॉ. उदय सामंत यांच्या आवाहनानुसार पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील नाट्यमंडळांच्या सहकार्याने गावांमध्ये बांधण्यात आलेल्या कच्च्या बंधाऱ्यांच्या उपक्रमाचा समावेश होता. तसेच डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धे’विषयीही त्यांनी माहिती दिली. आगामी वर्षभरात नाट्य परिषद शाखा रत्नागिरीमार्फत एकपात्री अभिनय स्पर्धा, श्री. रोहन मापुस्कर यांचे अभिनय प्रशिक्षण शिबिर, संगीत नाटकातील नाट्यप्रवेशांची स्पर्धा आणि आवाजाची कार्यशाळा हे उपक्रम राबवले जाणार असल्याचेही श्री. इंदुलकर यांनी नमूद केले.

आयत्या वेळच्या विषयात श्री. दुर्गेश आखाडे यांनी शंभराव्या नाट्यसंमेलनाचा समारोप कधी होणार, अशी विचारणा केली असता त्याबाबतचा निर्णय मध्यवर्ती मुंबईकडून घेतला जाईल, असे श्री. समीर इंदुलकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मोठ्या शहरांप्रमाणे रत्नागिरीतही नाट्य परिषदेमार्फत ‘कलाकार कट्टा’ सुरू करावा, अशी सूचना श्री. विजय साळवी यांनी मांडली, तर युवा सभासदांना परिषदेच्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यात यावे, असे श्री. योगेश सामंत यांनी सूचित केले. सभेच्या वेळी श्री. घनश्याम मगदूम यांनी तयार केलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा रत्नागिरीच्या वार्षिक अहवालाचेही प्रकाशन करण्यात आले.