राखी पौर्णिमा हा सण बहिण भावाच्या नात्यातील अत्यंत प्रेमळ असणारा सण आहे. आपले जो रक्षण करतो त्याला प्रेमपूर्वक राखी बांधली जाते. फक्त माणूसच नाही तर निसर्ग देखील आपले रक्षण करतो. म्हणूनच रक्षाबंधनाच्या दिवशी स्वरक्षणासाठी बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधणे इतकाच रक्षाबंधनाचा अर्थ मर्यादित न ठेवता माध्यमिक विद्यालय नाटळच्या विद्यार्थ्यांनी निसर्ग प्रेमाचे अनोखे रक्षाबंधन साजरे केले. प्राणीमात्रांना मुबलक व मोफत प्राणवायू, सावली, औषध संपत्तीचा साठा उपलब्ध करून देणाऱ्या तसेच समस्त मानव जातीचे रक्षण करणाऱ्या वृक्षवल्लीप्रती आभाराची व स्नेहाची भावना जपत प्रशालेच्या प्रार्थनास्थळी असणाऱ्या वृक्षाला पर्यावरण स्नेही साहित्यापासून बनवलेली राखी बांधत निसर्गप्रेम व्यक्त केले.
तसेच चांद्रयानाच्या यशस्वी मोहिमेत भरीव कामगिरी करणाऱ्या इस्रोच्या शंभर महिला व पुरुष वैज्ञानिकांना देखील प्रशालेमार्फत विद्यार्थ्यांनी तिरंगी रंगांचा वापर करून स्वतः बनविलेल्या राख्या पाठवून देश अभिमानाची भावना जपली आहे. सोबतच जिल्ह्यातील प्रशासकीय मान्यवरांना देखील प्रशालेमार्फत राख्या पाठवण्यात आल्या.
या राख्या बनवण्यासाठी प्रशालेमध्ये राखी बनवण्याची कार्यशाळा तसेच राख्यांचे विक्री व प्रदर्शन विद्यार्थ्यांनी अतिशय नियोजनबद्ध पार पाडले. या उपक्रमांसाठी प्रशालेच्या सहा. शिक्षिका श्रीम. प्रणिता बांबुळकर व सौ. आर्या कांबळी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
सर्व वर्गांमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात रक्षाबंधन सण साजरा केला. याप्रसंगी शालेय समिती चेअरमन श्री. नितीन सावंत, मुख्याध्यापक, शिक्षक – शिक्षकेतर वृंद उपस्थित होते. संस्था अध्यक्ष श्री.भालचंद्र सावंत, सेक्रेटरी श्री.निलेश सावंत , चेअरमन श्री. नितीन सावंत, मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत तांबे, सर्व संस्था पदाधिकारी ,शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी रक्षाबंधनाच्या या विविध उपक्रमांबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले.












