सावंतवाडी । प्रतिनिधी : श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, मळगाव येथे ५० फूट उंच हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाचे उद्घाटन शनिवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. हिंदुत्वाचे ज्वलंत विचार मांडणारे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. भिल्लवाडी ग्रुपचे अध्यक्ष पांडुरंग राऊळ, सदस्य आणि मळगाव ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व ग्रामस्थ, धारकरी आणि हिंदू प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या ध्वजस्तंभामुळे मळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे, अशी भावना पांडुरंग राऊळ यांनी व्यक्त केली आहे.












