निवृत्त मंडल अधिकारी दिगंबर पेडणेकर यांचे निधन

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावचे रहिवासी तथा निवृत्त मंडल अधिकारी दिगंबर विष्णू पेडणेकर ( ६७, सध्या राह. न्हावेली निर्गुणवाडी ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते तेथेच उपचारादरम्यान शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
      दिगंबर पेडणेकर यांनी शिरोडा, आजगांव, मळेवाडसह अन्य गावांमध्ये तलाठी म्हणून सेवा बजावली होती. काही वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर ते न्हावेली येथे घर बांधून तेथेच राहत होते. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्यांच्या काळात ते प्रसिद्ध होते. क्रिकेटचे त्यांना फार वेड होते. शिरोडा पंचक्रोशीतील मोठमोठ्या टेनिस बॉल स्पर्धांमध्ये मळगाव येथील क्रिकेट संघ ते स्पर्धेसाठी मुद्दामहून आणत असत.
       त्यांच्या आकस्मिक निधनामुळे मळगाव सह न्हावेली गावातही शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, दोन भाऊ, भावजया, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापिका दिपाली पेडणेकर यांचे ते पती, दिलीप पेडणेकर यांचे वडिल तर मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांचे ते काका होत. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी मळगाव रेडकरवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Sindhudurg