तब्बल 15 लाख 53 हजार रुपयांचा गुटखा मुद्देमालासह ताब्यात; दोन आरोपी अटक.
सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
सिंधनगरी प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गावर प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक होत असल्याच्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांचेकडून सापळा रचून घालण्यात आलेल्या धाडीत तब्बल 7 लाख 53 हाजार 380 रुपये किंमतीचा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुंगधी तंबाखुजन्य पदार्थ व 8 लाख रुपये किंमतीची बोलेरो गाडीसह तब्बल 15 लाख 53 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, व अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करुन अवैध व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून,जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी आपली करडी नजर ठेवली आहे.
शुक्रवार 1 सप्टेंबर रोजी स्थानिक अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांच्या पथकाला गोवा मुंबई महामार्गावरुन कणकवलीच्या दिशेने पहाटे अवैध गुटख्याची बोलेरो गाडीतुन वाहतुक होणार आहे अशी माहिती मिळाली होती.या माहितीनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, सहा. पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयडे, पोलीस हेडकॉन्टेबल प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, किरण देसाई, पोलीस कॉन्स्टेबल यशवंत आरमारकर, यांच्या पथकाने जिजामाता चौक ओरोस या ठिकाणी सापळा रचून बोलेरो गाडी क्रमांक MH-07- AJ-2851 थांबवुन गाडीतील 2 व्यक्तींसह ही बलेरो अधिक चौकशी करीता सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात आणुन तिची तपासणी केली असता, त्यामध्ये एकुण 7 लाख 53 हजार 980 रुपये किंमतीचा गुटखा व सुंगधित तंबाखुजन्य पदार्थ मिळून आला. या गाडीचा चालक अभय नारायण केसरकर, वय 43, रा. बांदा चाळसेवाडी तालुका सावंतवाडी आणि महादेव सुभाष नेवगी, वय 33 रा. इन्सुली डोबवाडी तालुका सावंतवाडी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून,या दोघांविरोधात अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26 ( 2 ) (iv), 27 (3) (d) (e) सह वाचन कलम 30 (2) (अ) चा भंग कलम 59 प्रमाणे सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर हे करीत आहेत.
सोबत फोटो
पकडलेला गुठका आणि संशईतांसह स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस












