मराठ्यांच्या तापलेल्या तव्यावर राजकीय नेत्यांनी भाकरी भाजण्याचा प्रयत्न करू नये

मराठा समन्वय समितीचे सदस्य गुरुनाथ गांवकर यांचे आवाहन

सावंतवाडी । प्रतिनिधी : जालना येथील प्रकारानंतर अनेक नेते आता या प्रकाराचे राजकारण करीत आहेत. मराठा समाजाच्या नावावर व मराठ्यांच्या तापलेल्या तव्यावर राजकिय नेत्यांनी भाकरी भाजण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन मळगांव मराठा समन्वय समितीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ गावकर यांनी केले आहे.जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी गावातील जी घटना घडली व मराठा समाजावर जो अमानुष हल्ला झाला त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. यापूर्वी मराठ्यांचे लाखो संख्येने संपूर्ण महाराष्ट्रभर मुक मोर्चे निघाले त्यावेळी कुठेही गालबोट लागले नाही. उलट शिस्त व त्याजागेची स्वच्छता राखण्यात आली.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी गावातील जी घटना घडली त्यामध्ये कुठल्या राजकीय पुढाऱ्यांचे षडयंत्र नाही ना अशा प्रकारचा संभ्रम समाजामध्ये निर्माण झाला आहे. मराठा मोर्च्याच्या काळात हे राज्यातले नेते कुठे होते जे आज या घटनेचे राजकारण करत आहेत.आज आमच्या समाजावर राजकीय भांडवल करु नका सर्वांनी एकत्र येऊन आम्हाला आरक्षण मिळवून द्यावे. व आमच्या मराठा समाजावर झालेला अन्याय दुर करावा. राजकीय स्वार्थापोटी तसेच हेतुपोटी आमच्या समाजाचा कुठल्याही पक्षाने वापर करुन घेऊ नये, असेही मळगांव मराठा समन्वय समितीचे सदस्य श्री गुरुनाथ गावकर यांनी म्हटले आहे.