गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील गणेश चित्रशाळा गजबजल्या

लांजा (प्रतिनिधी ) गणपती उत्सव काही दिवसांवर येवून ठेपल्याने तालुक्यातील गणेश चित्र शाळांमधून मूर्तिकारांची लगबग सुरू झाली असून मूर्तिकार दिवसरात्र रंगकामासह अखेरचा हात मारण्यात दंग झाल्याचे दिसून येत आहे.

यावर्षी १९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरूवात होते आहे. अवघे काहीच दिवस उरल्याने तालुक्यातील गणेश चित्रशाळा गजबजून गेल्या आहेत. तालुक्यातील मठ येथील सचिन गोसावी यांच्या गणेश चित्र शाळेत रंगकामासह अखेरचा हात मारण्यात मूर्तिकार व्यस्त झाले असून यावर्षी मातीचे व रंगाचे दर वाढल्याने गणेश मूर्ती देखील महाग झाल्या आहेत. तालुक्यातील मठ येथील सचिन गोसावी हे आपल्या वडिलांचा वारसा जोपासत गेली ५० वर्षे गणेश मूर्ती बनविण्याचा छंद सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून जोपासत आहेत. मातीचा व रंगाचा दर भरमसाठ वाढला आहे त्यातच कामगार यांची मजुरी व वाहतूक खर्च देखील वाढल्याने मूर्तिकार आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आला आहे मात्र गेल्या अनेक वर्षाची परंपरा जोपासताना ना नफा ना तोटा या तत्वावर मूर्तिकाम करावे लागत आहे. सचिन गोसावी यांच्या गणेश चित्र शाळेत मठ पंचक्रोशीसह लांजा व रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गणेश मूर्ती आकार घेताना दिसून येत आहे. दरम्यान वाढत्या महागाईमुळे तालुक्यातील गणेश मूर्तिकार मेटाकुटीला आल्याचे दिसून येत आहे.असे असले तरी बाप्पांच्या आगमनाच्या चाहूलीने गणेश चित्रशाळा व मंडळे कामाला लागली आहेत.