मोती तलावातील “बोटिंग” प्रकल्प पुन्हा करणार सुरु : मुख्याधिकारी सागर साळुंखे

शहरातील अन्य बंद प्रकल्प सुरू करण्यासाठीही प्रयत्नशील

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहराचा पर्यटन केंद्रबिंदू असलेल्या संस्थानकालीन ऐतिहासिक मोती तलावातील “बोटींग” प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प सुरू होईल अशी अपेक्षा असून याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दुजोरा दिला आहे. लवकरच हा बोटिंग प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. स्थानिक तरूण पुढे आल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सावंतवाडी शहरात पालिकेचे काही प्रकल्प बंदावस्थेत आहेत. त्यामुळे त्याचा फटका पालिकेला सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मोती तलावात सुरू असलेला बोटिंग प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या ठिकाणी असलेल्या बोटी घेऊन हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी येणारे पर्यटक शहरात स्थिरावत पर्यटनाच्या माध्यमातून अन्य लोकांना व्यवसाय उपलब्ध होईल, हा त्या मागचा उद्देश आहे. त्या दृष्टीने लवकरच आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करून हा प्रकल्प सुरू करण्यात येणार

असल्याचे सांगतानाच त्यानंतर शहरातील अन्य बंद प्रकल्प चालू करण्यासाठीही आपले प्रयत्न सुरू आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.