कार दुचाकी अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी

कार दुचाकी अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी
दोडामार्ग सुहास देसाई

दोडामार्ग ते तिलारी रस्त्यावरील गणपती मंदिरानजीक एक अल्टो कार व दुचाकी स्वार यांची जोरदार धडक बसून अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार बाहेर उसळून कारच्या बोनेटवर जोरदार आपटला. त्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला गोवा बांबुळी येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अल्टो कारमधील चालक व त्याची आई सुखरूप असून दोन्ही गाड्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये अभिषेक विलास आसोलकर (२५) रा.दोडामार्ग असे जखमी युवकाचे नाव असून ही दुर्घटना दुपारी घडली . याबाबत कारचालक प्रसाद विलास देसाई (२८) रा. कोलझर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीस्वार अभिषेक आसोलकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत येथील पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, कोलझर मधलीवाडी येथील प्रसाद विलास देसाई हे त्यांची आई विशाखा यांच्यासोबत मारुती सुझुकी अल्टो कारने दोडामार्ग येथील गणपती मंदिरानजीक असलेल्या एका कपड्याच्या दुकानात गणपती सणाच्या खरेदीसाठी आले. यावेळी प्रसाद यांनी त्यांची कार साटेली-भेडशीच्या दिशेने रस्त्याच्या बाजूला उभी केली होती. खरेदी झाल्यानंतर प्रसाद पुन्हा बाजारपेठेच्या दिशेने जाण्यासाठी निघाला असता कार वळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान रस्त्यावरून एखादी गाडी येते की नाही हे पाहून व रस्ता मोकळा दिसण्याची खात्री करून त्यांनी कार वळविली. मात्र त्याच वेळी दोडामार्गहून साटेली-भेडशीच्या दिशेने एक दुचाकी भरधाव जात असता त्याने कारच्या चालकाच्या बाजू कडील दरवाजाला जोरदार धडक दिली.
धडक बसल्यानंतर दुचाकीस्वार उसळला व कारच्या बोनेट वरून खाली पडला. अपघातानंतर प्रसाद व त्यांची आई यांनी गाडीतून खाली उतरले. यावेळी दुचाकीस्वाराच्या तोंडाला व डोक्याला मार लागल्याने रक्त येत होते. शिवाय हातापायालाही खरचटल्याने रक्तस्राव होत होता. अपघातानंतर लागलीच तेथे बघ्यांची गर्दी उसळली. यातील काहींनी त्याला तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमी दुचाकीस्वाराचे नाव अभिषेक आसोलकर असल्याचे यावेळी समजले. अभिषेक याने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने गाडी चालवली व कारला ठोकर देऊन स्वतःच्या गंभीर व किरकोळ दुखापतीस तसेच स्वतःच्या गाडीच्या नुकसानीस व कारच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी प्रसाद यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अभिषेक आसोलकर यांच्या विरुद्ध भादवि २७९, ३३७, ३३८, ४२७ व महाराष्ट्र मोटर वाहन कायदा १९८९ कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती येथील पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

फोटो