पुरस्कार प्राप्त प्रा. रोहिणी ओतारी यांचा आ.निकम यांच्या हस्ते गौरव
संतोष कुळे | चिपळूण : ग्रामीण भागात एखादे कॉलेज सुरू करणे हे जिकरी व धाडसाचे काम आहे. त्यात हॉटेल मॅनेजमेंट सारखा कोर्स सुरू करून विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम ए एच ए हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज करीत आहे. मात्र, या संधीचा फायदा घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेत ज्या क्षेत्रात प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये उत्तुंग स्थान निर्माण करण्याची जिद्द मनात बाळगली पाहिजे, असे उदगार चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे आ. शेखर निकम यांनी कार्यक्रम प्रसंगी काढले.
चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून ए एच ए हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिक्षक व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आ. शेखर निकम, डीवायएसपी राजेंद्र राजमाने, माजी पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, पिंपळी खुर्द सरपंच सौ. अंजली, दीपक ओतरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.कार्यक्रमात आ. निकम म्हणाले की, कोरोना काळात हॉटेल इंडस्ट्री पर्यटन आणि शिपिंग इंडस्ट्री यांच्यावरती मोठा परिणाम झाला. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम झाला. जगातील अर्थकारण हॉटेल इंडस्ट्री आणि शिपिंग इंडस्ट्रीवर चालत असते. कोरोनाच्या काळात अनेकांचे जॉब गेले.
त्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली होती. मात्र आता पुन्हा एकदा हॉटेल इंडस्ट्री सुरू झाली आहे. त्यामुळे निश्चितच हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल असणार आहे. बदलत्या काळाप्रमाणे आपण बदलले पाहिजे. चांगली शिक्षण घेऊन ज्या क्षेत्रात आपण पदार्पण कराल त्या क्षेत्रातले उत्तुंग स्थान घालवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आदर्श घेण्यासाठी दूरवर जाण्याची गरज नाही. कारण समाजाला आदर्श आणि मार्गदर्शक ठरतील अशा महाविद्यालयाच्या प्राचार्या रोहिणी दीपक ओतारी यांचे कार्य आहे. त्यांचे आ. निकम यांनी कौतुक केले.
सदर कार्यक्रमात आ. निकम यांनी प्रा. रोहिणी ओतारी यांना मिळालेल्या आयकॉनिक रोल मॉडेल एज्युकेशन 2023, नॅशनल बेस्ट एज्युकेशनीस्ट ऑफ द इयर इन एज्युकेशन हे पुरस्काराचे वितरण आ. शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. याच वेळी नुकताच वर्षापासून सुरू झालेल्या “गुरु द्रोणाचार्य 2023” या पुरस्कारासाठी सुद्धा प्रा. रोहिणी दीपक ओतारी यांच्या नावाची सर्वानुमते निवड करून त्यांना हा बहुमान आ. निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
डीवायएसपी राजेंद्र राजमाने यांनी सुद्धा महाविद्यालयाच्या कामाचे तसेच उपलब्ध सोयी सुविधांचे कौतुक करून इतक्या कमी वेळामध्ये विद्यार्थी परदेशात ट्रेनिंगसाठी महाविद्यालय पाठवत असल्याचे बोलून प्राध्यापक रोहिणी ओतारी यांचे कौतुक केले. स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये आ. निकम यांनी ओमान या देशामध्ये ट्रेनिंग साठी निवड झालेल्या शुभम पाटील आणि रवींद्र जाधव यांचा गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रोहिणी ओतारी यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक ललित कांडवेलकर आणि आभार प्रा. प्रणाली भागडे, यांनी मानले.












