चिपळूण (प्रतिनिधी):– येथील उपविभागीय कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी शिल्पा शृंगारे उर्फ गिज्जेवार यांच्या कामकाजाची कोकण विभाग आयुक्त स्तरावर दखल घेण्यात आली. महसूल दिनाचे औचित्य साधून त्यांचा महसूल विभागाचे अप्पर सचिव विकास खारगे यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव करण्यात आला.
दरवर्षी महसूल दिनाचे औचित्य साधून महसूलमधील विविध पदावरील उत्कृ ष्ट अधिकाऱ्याऱ्यांच्या कामकाजाची दखल घेत त्यांचा गौरव केला जातो. चिपळूण प्रांत कार्यालयातील उत्कृष्ट सहायक महसूल अधिकारी म्हणून निवड झालेल्या सौ. शिल्पा शृगांरे उर्फ गिज्जेवार यांनी कुळवहिवाट कायदेखालील अर्धन्यायिक कामकाजामध्ये आधुनिक प्रणालीचा वापर केला. त्या केसेस बाबत सुनावणी तारखा, आदेशाची माहिती जनतेला घरबसल्या उपलब्ध करुन देण्याबाबत गतिमान कामकाज केले. दैनंदिन कामकाजात ई ऑफिस प्रणालीचा प्रभावीपणे वापर केला आहे.
मागील लोकसभा व विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये उल्लेखनीय कामकाज केले. विभागीय व राज्यस्तरीय महसूल स्पर्धेत प्रतिनिधित्व करुन रत्नागिरीला जिल्ह्याला विजेतेपद व कोकण विभागाला राज्यस्तरावर उपविजेतेपद प्राप्त करुन दिले आहे. दैनंदिन कामकाजात कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या कामांबाबत संवेदनशील राहून कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेले आहे. त्यांच्या या विविध कामकाजाची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला.
सौ. शृंगारे या चिपळूण उपविभागाचे जमीन विषयक विविध दावे, सुनावणी, निवडणूक, भूसंपादन विषयक कामे सांभाळतात. २०२१ मध्ये स्वतः गर्भवती असताना बाजारपेठेतील सर्व पूग्रस्तांचे पंचमाने व त्यांचे खाते व्यवस्थित तपासून पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळणेसाठी दिवस रात्र बिनचूक कामे केली. गेल्या १८ वर्षाच्या कालावधीत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखा, भूसंपादन, कुळवहिवाट, तहसीलदार कार्यालय चिपळूण अशा विविध कार्यालयात कामकाज केले आहे.












