रस्त्यांवर येणारे सांडपाणी तात्काळ बंद करा

मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर आक्रमक

त्वरित कार्यवाही करा, अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याबाबत मांडली भूमिका

मालवण / प्रतिनिधी : मालवण स्टेटबँक मागील मथुरा काँप्लेक्स येथील सांडपाणी लगत असणाऱ्या लहान मुलांचे परुळेकर हॉस्पिटल समोरील रस्त्यावर साचून दुर्गंधी पसरली आहे. या समस्या बाबत सामाजिक कार्यकर्ते सिजर डिसोजा व नागरिकांनी संबंधित कॉम्प्लेक्स बाबत तीव्र संताप व्यक्त केला होता.

याबाबत माहिती मिळताच माजी नगरसेवक दीपक पाटकर, विलास मुणगेकर, भाजप युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, निनाद बादेकर, दुर्गेश गावकर, लुडबे व सहकारी तसेच बुधवारी दुपारी पालिका आरोग्य व स्वच्छता विभाग अधिकारी, कर्मचारी यांना घेऊन त्याठिकाणी पोहचले. लहान मुले, नागरिक यांच्या आरोग्यास त्रासदायक ठरेल अश्या प्रकारे दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर सोडणाऱ्या संबंधितांवर तात्काळ कारवाई पालिका प्रशासनाने करावी. तसेच रस्त्यावर येणारे सांडपाणी तात्काळ बंद करण्याबाबत कार्यवाही करावी अशी भूमिका दीपक पाटकर यांनी मांडली.

या समस्या प्रशनी आवाज उठवणारे सिजर डिसोजा हेही यावेळी उपस्थित झाले. कॉम्प्लेक्स धारकांनी, पालिका प्रशासनाने काय करावे ते तात्काळ करा. सांडपाणी रस्त्यावर येता नये असे सांगत दीपक पाटकर यांच्याप्रमाणे आक्रमक भूमिका मांडली. यावेळी कॉम्प्लेक्स मधील काही रहिवाशी उपस्थित होते. परिसरात मोठा खड्डा पाडून त्यात उघड्यावर सोडलेले पाणी वाढलेल्या दाट झाडीतून रस्त्यावर जात होते. ही वस्तुस्थिती रहिवाशी यांनाही दाखवण्यात आली. तात्काळ कार्यवाही झाली नाही तर पालिका अधिकारी यांनी संबंधितावर गुन्हे दाखल करावेत अशीही मागणी दीपक पाटकर व उपस्थिता नी यावेळी केली.