दहावीतील पार्थची रांगोळीतून ‘बाळकृष्ण’ कलाकृती

दहावीतील पार्थची रांगोळीतून ‘बाळकृष्ण’ कलाकृती

भंडारी हायस्कुलच्या पार्थ मेस्त्रीची रांगोळी ठरली लक्षवेधी

मालवण प्रतिनिधी : मालवण भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त प्रशालेतील इयत्ता दहावी मधील विद्यार्थी पार्थ साईनाथ मेस्त्री याने बाल श्रीकृष्णाची साकारलेली आकर्षक रांगोळी लक्षवेधी ठरली.

इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेणारा पार्थ मेस्त्री हा उत्तम चित्रकार व रांगोळीकर असून लहान वयात त्याने आपल्या कलेची प्रतिभा दाखवून सर्वांची वाहवा मिळविली आहे. आषाढी एकादशी निमित्त तुळशीच्या पानावर श्री विठ्ठलाची प्रतिमा रांगोळीतून साकारून केलेल्या कलाकृतीची दखल आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये घेण्यात आली असून कमी वेळेत तुळशीच्या पानावर रांगोळी साकारल्याबद्दल पार्थ मेस्त्रीची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली आहे. तसेच विविध रांगोळी स्पर्धामध्येही पार्थ याने नेत्रदीपक यश मिळविले आहे. भंडारी हायस्कुल मध्ये गोकुळष्टमी उत्सवानिमित्त पार्थ याने बाल श्रीकृष्णाची प्रतिमा रांगोळीतून साकारात अल्लड बाळकृष्णाचे चेहऱ्यावरील भाव रांगोळीतून उत्तमपणे रेखाटले आहेत. त्याची ही रांगोळी लक्षवेधी ठरत असून या कलाकृतीबद्दल त्याचे कौतुक होत आहे.

फोटो : भंडारी हायस्कुलच्या पार्थ मेस्त्रीने रांगोळीतून बाल श्रीकृष्ण लक्षवेधी कलाकृती साकारली. (अमित खोत, मालवण)