दापोलीत 2 लाख 30 हजार किमतीची देशी दारू जप्त

दापोली(प्रतिनिधी)
 दापोली पोलिसांनी आज दुपारी इको गाडीतून बेकायदा देशी दारू व बीअरचे बॉक्स यांची वाहतूक केल्याप्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून 2 लाख 30 हजार रूपये किमतीची देशी दारू व बीअरचे बॉक्स व वाहन असा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास दापोली बसस्थानकाजवळील चौकात ट्राफिक जाम झालेले असल्याने दापोली पोलिसांचे एक पथक या वाहतुकीचे नियमन करत असताना त्यांना एक मारूती इको क्रमांक एमएच 08 आर 8636 ही जाताना दिसली. या वाहनात देशी दारूचे तसेच बीअरचे बॉक्स आढळून आल्याने हे वाहन थांबवून चालकाकडे मद्य बाळगण्याचा व त्याची वाहतूक करण्याचा परवाना आहे का अशी विचारणा केली असता चालक ऋतिक संतोष लांबे यांनी असा कोणताही परवाना आपल्याकडे नसल्याचे सांगितल्यावर हे वाहन पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
या वाहनात 26 हजार 880 रूपये किमतीचा जीएम संत्रा देशी दारूच्या 180 मिलीच्या 336 बाटल्या, 8 हजार रूपये किमतीच्या जीएम संत्रा देशी दारूच्या 90 मिलीच्या 200 बाटल्या, 7 हजार 200 रूपये किमतीचे 500 मिलीचे टयुबर्ग बीअरचे 48 टीन, 9 हजार 600 रूपये किमतीच्या 650 मिलीच्या टयुबर्ग बीअरच्या 48 बाटल्या, 7 हजार 20 किमतीच्या 650 मिलीच्या किंगफिशर बीअरच्या 36 बाटल्या, 3 हजार 600 रूपये किमतीचे 500 मिलीचे किंगफिशर बीअरचे 24 टीन, 6 हजार 480 किमतीचे लंडन प्लीसनर बीअरचे 500 मिलीचे 48 टीन, 11 हजार 880 रूपये किमतीच्या 650 मिलीच्या लंडर प्लीसनर बीअरच्या 72 काचेच्या बाटल्या, 1 लाख 50 हजार किमतीचे वाहन असा एकूण 2 लाख 30 हजार 660 रूपये किमतीचा मुद्देमाल पंचनामा करून दापोली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास दापोली पोलिस करत आहेत.