अवैध मद्य वाहतुकीला संरक्षण पुरविणारी टोळी
राजापूर (प्रतिनिधी): अवैध मद्य वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या पोलीसांवर गोळीबार केल्याप्रकरणी पोलीसांनी अटक केलेल्या त्या तीनही संशयीत आरोपींना गुरूवारी राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणातील अन्य चार ते पाच जणांचा सहभाग असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तर या संशयीत आरोपींनी गुन्हयाकामी वापरलेली एक स्वीप्ट कार व अन्य साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी दिली आहे. अवैध मद्य वाहतुकीच्या गाडयांना संरक्षण पुरविण्याचे काम ही टोळी करत असल्याची माहीती पोलीस तपासात पुढे आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथे मुंबई-गोवा महामार्गावर सापळा रचून दारू वाहतूक करणारा ट्रक पकडल्यानंतर मागून दोन चारचाकी वाहनातून आलेल्या आठ जणांच्या टोळक्याने पोलिसांना कारवाई करण्यास अटकाव करत गोळीबार करून दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला घेवून पलायन केल्याची थरारक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली होती.
दरम्यान दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चालक व गोळीबार करणारे सोलापूर येथील असल्याची माहिती समोर आली असून संबंधित चालक व त्याचे दोन साथीदार याला बांदा चेकपोस्ट येथे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यामध्ये शेखर नेताजी भोसले, प्रविण पर्रशुराम पवार व रमेशकुमार मंगलदात चौधरी यांचा समावेश आहे. या तीघांनाही गुरूवारी राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहीती धुमाळ यांनी दिली.
या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक सतिश इंगले यांनी राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिलेली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबई येथील भरारी पथकाने मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथे अवैधरित्या होणारी दारूवाहतूक रोखण्यासाठी सापळा लावला होता. मंगळवारी मध्यरात्री 1.40 वाजण्याच्या सुमारास संशयित वाहन (क.एम.एच.46. ए.एफ. 6183) समोरून येताना दिसल्याने पोलिसांनी सदरचे वाहन थांबविले. यावेळी वाहन चालक महावीर भोसले व त्याच्यासोबत ज्ञानेश्वर उन्हाळे (रा.पोखरापूर, ता.मोहोळ, जि.सोलापूर) या दोघांची पोलिसांनी चौकशी केली असता गोव्यावरून अवैध मद्यसाठा भरून सोलापूरला घेवून जाणार असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली.
दरम्यान या वाहनाची चौकशी सुरू असताना 10 मिनिटानंतर गोव्याकडून अचानकपणे स्विफ्ट (क्र.एम.एच.14. जे. ए.4155) व फॉर्म्युनर (क्र.एम.एच. 9090) अशा दोन गाड्या त्या ठिकाणी येवून थांबल्या. या गाड्यांमधून 8 जणांचे टोळके खाली उतरले. यापैकी एक इसम हा सोमनाथ उर्प प्रशांत उर्प बापू तुकाराम भोसले (रा.खवणी, ता.मोहोळ, जि.सोलापूर) तर दुसरा त्याचा चुलत भाऊ शेखर भोसले हा होता. बापू भोसले व त्याच्या साथीदारांवर या आधी राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये 10 पेक्षा जास्त गुन्हे नोंद असल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
बापू भोसले याने पोलिसांना माझी गाडी सोडा, तुमच्या विभागाने आतापर्यंत माझ्या भरपूर गाड्या पकडल्या असून माझ्या मद्य व्यवसायाचे खूप नुकसान केलेले आहे. ही गाडी कुठल्याही परिस्थितीत नेवू देणार नाही, असे धमकावत पोलिसांच्या अंगावर जावून त्याच्या कमरेला असणारी पिस्तुल काढून आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यानंतर पिस्तुलमधून एक राउंड हवेत फायर करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने न ऐकता पुन्हा दुसरा राउंड हवेत फायर केला. त्यानंतर त्याने पोलिसांनी चौकशीसाठी थांबविलेल्या वाहन चालकाला व त्याच्या साथीदाराला आपल्या स्विफ्ट गाडीमध्ये बसविले व दोन्ही चारचाकी गाड्यातून पलायन केले होते. यातील या तीन आरोपींनी पकडण्यात यश आले होते.
अद्यापही चार ते पाच जण संशयीत आरोपी असून त्यांचा पोलीस शोध घेत असल्याचे धुमाळ यांनी सांगितले. या गुन्हयात वापरण्यात आलेली दुसरी फॉरच्युनर गाडीचाही पोलीस शोध घेत असून त्यासाठी विशेष पथक काम करत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
या टोळक्याचा अशा प्रकारे अवैध दारू वाहतुकीच्या गाडयांना सरंक्षण पुरविणे, या गाडया मुंबई, राजस्थान व अन्य बाहेर नेण्यासाठी मदत करणे हाच धंदा असून या टोळक्याची पाळेमुळे खणून काढुन पोलीस प्रशासनाकडून कायमचा बंदोबस्त केला जाईल असेही पोलीसांनी सांगितले.











