सिंधुदुर्गचे माणिकमोती : कुडाळचे विख्यात रंगभूषामहर्षीः बाबा वर्दम

…. कुडाळ म्हटले की देव कुडाळेश्वर नि कुडाळेश्वर मंदिर आठवते.कुडाळदेशकर राजवट व कुडाळचा कोटआठवतो. प्रभावळकर राजघराण्याचा वाडा आठवतो…आणि माझ्यासारख्या अनेकांना कवी आरती प्रभू यांचे बाजारपेठेतील ‘वीणा गेस्ट हाऊस’ आठवते. याच बाजारपेठत गमशेठ वर्दम आणि कुटुंबीयांचे समादेवी मंदिराजवळ निवासस्थान आहे.हेच सखाराम गमशेठ ऊर्फ रंगभूषाकार बाबा वर्दम यांचे जन्मस्थान होय.

त्यांचा कुटुंबाचा गोतावळा सुद्धा मोठा होता.ते एकत्र कुटुंबात वाढले. त्यांच्या वडिलांचा व त्यांच्या काकांचा एकत्र मिळून कुडाळ एसटी स्टँडसमोर हॉटेल व्यवसाय करत होते ..

आज कुडाळला तुम्ही कुणाला विचारले तर ‘सखाराम गमशेठ कोण ?’तर उत्तर कदाचित मिळणार नाही मात्र ‘बाबा वर्दम हे नाव घ्या ‘अन्य माहिती फारशी मिळेलच असे नाही.. पण हे नाव मात्र गेली अनेक वर्षे सर्वसामान्य कुडाळवासियांनाही ज्ञात आहे. आणि याचे कारण आहे त्यांची स्मृती जपणारे ‘बाबा वर्दम थिएटर्स’ही नाट्य-एकांकिका ‘या क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असणारी संस्था.

++

….तर अशा वर्दमांच्या घरी सखाराम ऊर्फ बाबांचा जन्म दिनांक ७ जानेवारी१९०९ रोजी झाला.त्यांचे वडील गमशेठ व काका एकत्रितपणे हाॕटेल व्यवसाय करत व कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे.

*वर्दम घराणे-*

..काही दिवसांपूर्वी बाबांचे पुतणे राकेश चंद्रकांत वर्दम यांच्याशी बोलणे झाले.कुडाळच्या प्रसिद्ध वर्दम घराण्याविषयी थोडी माहिती मिळाली.सध्याच्या वर्दमांचे पूर्वज गुजरात प्रदेशातून व्यापारानिमित्त कधीकाळी श्रीवर्धनला आले.तेथून पुढे कोल्हापूर,नारूर,पावशी असे करीत-करीत एक शाखा कुडाळला स्थिरावली, आजही या गावात वर्दम कुटुंबे रहातात. बहुतेक कोणता ना कोणता व्यवसाय,व्यापार करतात.या घराण्याची कुलदेवता श्रीवर्धनस्थित ‘काळेश्वरी’ तेथील प्रसिद्ध ‘सोमजाई’ मंदिराजवळच हे काळेश्वरीमातेचे मंदिर आहे.पण सर्व मंडळी काळेश्वरी देवीबरोबर महालक्ष्मी,सातेरी या ग्रामदेवतांनाही आपल्या आराध्यदेवता मानतात.

कुडाळला जी शाखा स्थिर झाली त्यापैकी गमशेठ वर्दमांचे सखाराम ऊर्फ बाबा हे चिरंजीव .

बाबांना तीन अपत्ये दिनकर, सदानंद व कन्या कुसुम.आज कुडाळ शहरात वर्दमांची तीन कुटुंबे रहातात पैकी बाबांचे एक पुतणे राकेश चंद्रकांत वर्दम की जे ‘बेकरी ‘व्यवसाय उत्तम प्रकारे करतात.त्यांच्याशी मी संवाद साधला.त्यांनी बोलताना एक सहज माहिती सांगितली.आमच्या वर्दम घराण्यातील राजाराम अप्पाशेठ वर्दम हे साईभक्त होते.. ते साईबाबांना भेटायला त्याकाळात शिर्डीला गेले होते.

*कष्ट करणारे वडील-*

गमशेठ वर्दम यांना दादा म्हणत, त्यांच्या पत्नीचे नाव आनंदी म्हणजेच बाबाच्या आई,बाबांच्या पत्नीचे नाव इंदिरा बाबा मिळून एकूण आठ भावंडे त्यात पाच मुलगे तीन मुली.बाबांचे वडील म्हणजे दादा हे दत्तभक्त होते.साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी ते त्यांचे लहान भाऊ राजाराम आणि माडये बुवा यांना घेऊन ते शिर्डीला गेले होते व त्यांनी त्यावेळी जिवंत साईबाबांचे दर्शन घेतले होते. बाबांना दोन काका व तीन आत्या होत्या बाबांचे वडील हे सर्वात मोठे गमशेठ त्यानंतर दोन नंबर रामचंद्र आणि तीन नंबर राजाराम गमशेठ, व रामचंद्र यांचा व्यवसाय हॉटेल होता. राजाराम यांचा व्यवसाय कुड्याच्या विडीचा कारखाना, गॅस बत्ती व सायकल भाड्याने देणे व पानपट्टी स्टॉल असे व्यवसाय होते.

++

राकेश वर्दम म्हणाले-“त्यांचे कुडाळसाठी योगदान काय? .तर..बाबा वर्दम कुडाळ मध्ये असताना त्यांना नाटकाचे प्रचंड वेड होते.त्यामुळे ते येथीलच आपल्या मित्रांबरोबर नाटके बसवायचे व त्याचे सादरीकरण करायचे हे नाटकाचे वेळ ते मुंबईला गेल्यावर सुद्धा काही चुकले नाही त्यामुळे मुंबईत बसून सुद्धा कुडाळातील नाट्य चळवळ त्यांनी आपल्या प्रयत्नाने चालू ठेवली होती. मग नाटकासाठी लागणारे कपडे, मेकअपचे, व इतर लागणारे साहित्य ते मुंबईहून पाठवून देत असत.त्याचप्रमाणे गावातून मुंबईला रोजगारासाठी जात त्यांना एकतर आपल्याकडे काम देणे किंवा मुंबईत काम मिळवून देणे त्यांची राहण्याची-जेवणाची व्यवस्था करणे.अशाप्रकारचे एक सहाय्य करण्याची वृत्ती त्यांची होती. मुंबईला ते ग्रँड रोड येथे टोपीवाला लेनमध्ये राहत होते ती खोली अजूनही टोपीवाला लेनमध्ये आहे.”

++

*बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ-*

..माझा हा लेख लिहिताना राकेश वर्दम यांचा परिचय झाला.आम्ही २-३ वेळा बोललो.राकेश यांनी या विषयी एक लेख मला पाठवला. त्यातील काही भाग या लेखात त्यांच्या परवानगीने समाविष्ट करत आहे. कारण ही संस्था ती कला क्षेत्रात करत असलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे कार्य मी फक्त ऐकून आहे.होतो.तेव्हा बाबा वर्दम यांच्या स्मृतीजपण्यासाठी या संस्थेच्या अध्यक्ष,पदाधिकारी व सदस्य यांनी जे कार्य केले त्याला तोड नाही.महान व्यक्तीच्या स्मृती कशा जपाव्यात यांचे ही संस्था एक पथदर्शक नाव आहे.राकेश वर्दम लिहितात-

“बाबा वर्दम थिएटर्स’कुडाळ अर्थात बी.व्ही.थिएटर्स, कुडाळ ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये विविध ठिकाणी एकांकिका व नाटकांच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन उत्कृष्ट सादरीकरण करून जिल्हा स्तरावर व राज्यस्तरावर वेगवेगळ्या नाट्य प्रकारांमध्ये गेली काही वर्षे पारितोषिके मिळवत आलेली कुडाळातील एक उत्कृष्ट नाट्यसंस्था.

या नाट्यसंस्थेला ज्या व्यक्तीचे नाव आहे त्याबद्दल आपण माहिती करून घेऊ.

” बाबा वर्दम यांचा जन्म -बालपणाचा काळ कुडाळला गेला. त्याकाळी वर्दम कुटुंबियांचा

हॉटेल व्यवसाय होता.

त्यावेळी प्रत्येक गावांमध्ये वेगवेगळ्या देवस्थानांच्या जत्रा मोठ्या प्रमाणात भरायच्या. वर्दम कुटुंबीय या प्रत्येक जत्रेमध्ये आपल्या हॉटेलमध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ व मिठाई सजावट करून मांडायचे आणि दुकानांच्या गर्दीमध्ये आपले दुकान पटकन नजरेत यावे यासाठी आजूबाजूने तीन बाजूला लागणारे पडदे विशिष्ट प्रकारे रंगवून घ्यायचे.यासाठी वर्दम कुटुंबीय खास मुंबईवरून काही पेंटरना बोलवत असत.*हे पडदे रंगवत असताना त्यातील रंगसंगती रेखाटन हे बाबा वर्दम नेहमी बघत असत.हे रेखाटन व* *रंगसंगतीबद्दल बाबांना पहिले ज्ञान तिथून मिळाले आणि याच ज्ञानाच्या जोरावर शाळेमध्ये त्यांनी चित्रकलेच्या परीक्षा व स्पर्धेमध्ये चांगले गुण मिळविले.*

या जत्रांमध्ये प्रमुख आकर्षण असायचे ते दशावतरी नाटक. या दशावतारी नाटकांमध्ये असलेली पात्रे ही स्वतःची रंगभूषा ही स्वतःच करत असत ही रंगभूषा बाबा वर्दम तासन-तास बघत असायचे..मला वाटते रंगभूषेचे बाळकडू व त्यातील बारकावे त्यांना इथूनच मिळाले असावे. त्यानंतर दशावतरी नाटक बघण्यातही ते तेवढेच तल्लीन व्हायचे.यामुळे बाबांची नाटक व कलेकडे ओढ निर्माण झाली. त्यामुळे एखादे चांगले नाटक पाहिल्यावर त्यातील काही प्रसंगांच्या तालमी…आपल्या सात-आठ मित्रांना घेऊन कुठल्यातरी देवळाच्या धर्मशाळेत किंवा कुठल्यातरी एका खोलीमध्ये करून ते आपली नाटक करण्याची हौस भागवून घेत.त्यानंतर काही काळाने बाबा वर्दम व त्यांच्या काही मित्रांनी एकत्र येऊन ‘करीन ती पूर्व ‘हे नाटक बसवले.या नाटकातील उत्पन्नातून पुढे मोठी नाटके बसवायची व नाटक मंडळ स्थापन करण्याचा बेत त्यांनी आखला होता.या नाटक मंडळीचे नावही ‘हनुमान प्रसादिक मंडळी ‘ असे ठरवले होते. ‘करीन ती पूर्व’ या नाटकानंतर नाटक मंडळीतील माणसे उदरनिर्वाहाच्या साधनांसाठी गाव सोडून गेल्यामुळे हे नाट्यमंडळ पुढे जास्त प्रगती करू शकले नाही.

या घडामोडी घडत असताना बाबांवर संसाराची जबाबदारी सुद्धा पडली. नाटकाच्या वेडामुळे बाबांचे हॉटेल व्यवसायाकडे थोडेसे दुर्लक्ष होत होते.खरंतर कलासक्त बाबांचे मन हॉटेल व्यवसायामध्ये रमत नव्हते, त्यामुळे बाबांनी पुढे मुंबईला जायचा निर्णय घेतला.

*जीवनाला कलाटणी-*

मुंबईला त्यांची बहिण पार्वतीआते शिरसाट या गिरगावात राहत . त्यांच्याकडे ते येऊन राहिले. पुढे उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या नाटकांचे वेगवेगळ्या दुकानांचे बोर्ड रंगविणे, इमारतीला रंग काम करणे अशी काही कामे करायला लागले.असेच एकदा मचाणावर चढून एका इमारतीचे रंगकाम करत असताना खाली रस्त्यावरून एक व्यक्ती जात होती. तिची नजर बाबांवर पडली.बाबांना बघून त्या व्यक्तीने मुकादमाला बाबांना खाली उतरवण्यास सांगितले.बाबा खाली उतरताच त्या व्यक्तीने बाबांना कडकडून मिठी मारली ती व्यक्ती होती कै.संगीतकार वसंतराव देसाई. वसंतराव देसाई हे बाबांचे कुडाळातील लहानपणापासूनचे मित्र होते. वसंतराव देसाई हे ‘करीन ती पूर्व” नाटकानंतर कोल्हापूरला गेले. संगीताचे चांगले ज्ञान असल्यामुळे कोल्हापूरला प्रभात चित्रपट कंपनीत कामाला लागले. आणि त्यानंतर पुढे काही वर्षांनी मुंबई येथे येऊन राजकमल स्टुडिओत शांतारामबापूंकडे म्हणजेच व्ही. शांताराम यांच्याकडे नोकरीला लागले होते. बाबांनाही कलेची व नाटकांची आवड व जाण आहे हे देसाई चांगले जाणुन होते. त्यामुळे ते बाबांना थेट राजकमल स्टुडिओ मध्ये नेऊन शांतारामबापूं बरोबर ओळख करून दिली. शांताराम बापूंनी पण त्यांना लगेच नोकरी दिली.त्यावेळी शांताराम बापूंकडे कै.दादा परांजपे हे रंगभूषाकार कलाकारांच्या रंगभूषेचे काम पाहत होते. त्यांच्याबरोबर ते सहाय्यक म्हणून काम करू लागले.मुळातच कलेची आवड, कठोर मेहनत, कडक शिस्त व दादा परांजपे यांच्यासारखा गुरु, साथीला मिळालेले उत्कृष्ट दिग्दर्शक शांतारामबापू यांचे मार्गदर्शन यामुळे अल्पावधीतच ते राजकमलचे मुख्य रंगभूषाकार म्हणून बाबा प्रसिद्धीस येऊ लागले.येथूनच बाबांचा रंगभूषाकारचा प्रवास चालू झाला.शांतारामबापूंच्या राजकमल प्रॉडक्शनने काढलेल्या जवळजवळ सर्वच चित्रपटांमध्ये बाबांची रंगभूषेची किमया पाहावयास मिळते, यामध्ये तीन बत्ती चार हात मधल्या संध्या चा काळा मुलीचा मेकअप,नवरंग मधलं महिपालचा ओल्ड मेकअप, ‘दो आंखें बारह हात’ या चित्रपटातल्या सहा कैद्यांचा वेगवेगळा मेकअप असे अनेक अभ्यास पूर्ण मेकअप सांगता येतील.शांताराम बापूंचा झनक झनक पायल बाजे हा टेक्निकलर मधील पहिलाच चित्रपट असल्यामुळे शांताराम बापूंनी काही जर्मन रंगभूषाकार या चित्रपटासाठी भारतात आणले होते. या रंगभूषाकारा कडून बाबांनी वेगवेगळे केसांचे वीग विणून शिवायचे, दाढी, मिशी बनविण्याचे, टक्कल बनविण्याचे, मेकअपला लागणाऱ्या वेगवेगळ्या रंगांमधील पावडर बनविण्याचे ज्ञान आत्मसात करून घेतले व पुढे हे ज्ञान त्यांनी आपल्या दिनकर (नाना )व सदानंद (बाबी) यांनाही दिले. हळू हळू या दोन्ही मुलांची मदतही बाबांना मिळत होती.

यात काही वर्षे बाबा वर्दम यांनी त्यावेळेचे अमिताभ बच्चन म्हणजेच भारत भूषण यांचे पर्सनल मेकअपमन म्हणून सुद्धा काम केले होते.”

“बाबांना अभिनयाची आवड होती त्यामुळे दरम्यानच्या राजकमलच्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी छोटे-मोठे रोल सुद्धा केले. पुढे जाऊन राजकमल मध्ये काम करत असताना मैत्री झालेल्या पु. ल. देशपांडे यांनी रंगभूषाकार म्हणून बाबांना नाट्यसृष्टीत आणले.परंतु नाट्यसृष्टीतील आणि सिनेमा सृष्टीतील मेकअप हे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे असल्यामुळे नाट्यसृष्टीतील मेकअपसाठी जास्त मनुष्यबळाची गरज पडत होती. कारण मुंबईमध्ये त्यावेळी अनेक नाटक कंपन्या कार्यरत होत्या उदाहरणार्थ रंगशारदा, नाट्यसंपदा,पौर्णिमा थेएटर्स, माऊली प्रॉडक्शन, साहित्य संघ, या सर्व नाटक कंपन्यांच्या नाटकांचे मेकअप बाबांना एकट्याने करणे शक्य नव्हते. त्यामुळे बाबांनी काही नात्यातील मुलांना, मित्रांच्या मुलांना गावाकडील मुलांना बोलावून या कलेबद्दल प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. यामध्ये शंकरभाई वर्दम,रमेश वर्दम,भरत वर्दम,प्रदीप वर्दम,नंदू वर्दम,राजन वर्दम,पंढरी जुंकर, सुरेश ओटवणेकर ,विलास कुडाळकर,अशोक व उल्हास शिरसाट,अशी पुष्कळ लोकांची नावे घेता येतील.या सर्व मुलांना बाबांनी हातचे काही न राखता रंगभूषेचे प्रशिक्षण दिले तसेच या लोकांचे संसार सुद्धा उभे केले. बाबा वर्दम यांच्या तिसऱ्या पिढीमध्ये मनोज, शैलू, किरण, ओमकार ही मुले कार्यरत आहेतच आता चौथ्या पिढीने सुद्धा या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.कुडाळला शंकरभाईंनंतर हेमंत वर्दम याने रंगभूषेची परंपरा चालवली आहे.”

++

…बाबांनी नाट्यसृष्टीत सुद्धा आपल्या रंगभूषेची छाप उमटवली होती.त्यात तो मी नव्हेच मधील प्रभाकर पणशीकर यांचा पाच भूमिकांचा मेकअप, हिमालयाच्या सावली मधील श्रीराम लागूचा मेकअप, अशी बरीच उदाहरणे देता येतील. तसं पाहिलं तर महाराष्ट्राच्या सिनेसृष्टीतील आणि नाट्यसृष्टीतील बाबांचे हे योगदान विसरता येणार नाही.

….अशा या थोर कलाकारांचं वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झाले निधनाची बातमी ऐकून व्ही. शांताराम बापूंनी

“बाबा तू खूप लवकर गेलास तुझ्याबरोबर अनेक वर्ष अजून काम करायचे होते.” असे उद्गार काढले.(संदर्भ राकेश वर्दम, कुडाळ)

*कुडाळचे सुप्रसिद्ध बाबावर्दम थिएटर-*

कुडाळकर नाट्यप्रेमी,

नाट्यकर्मीनी बाबांची स्मृती

अत्यंत आदरपूर्वक जपून ठेवली आहे.गेली २५ वर्षे येथे नाट्यस्पर्धांचे आयोजन केले जाते.मराठी रंगभूमीवरील नामवंत संस्थानी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.गेल्यावर्षी

नाट्यमहोत्सव राज्यस्तरावरील ७ नाटकांचा समावेश होता.बाबा वर्दम थिएटर्स या नोंदणीकृत हौशी नाट्यसंस्था आहे. गेल्यावर्षी ७ ते १३ जानेवारी दरम्यान ‘बाबा वर्दम स्मृती नाट्यमहोत्सव २०२३’चे आयोजन केले होते. महोत्सवाचे हे पंचविसावे वर्ष असून मुंबई, पुणे, सोलापूर, सांगली,सिंधुदुर्ग येथील सात नाटके सादर झाली होती. थिएटर्सचे कार्यवाह केदार सामंत यांनी आपल्या सहकारींनी घेऊन स्पर्धा यशस्वी केली. थिएटर्सचे माजी अध्यक्ष आनंद वैद्य यांचेही महत्त्वाचे योगदान आहे. याविषयी सामंत म्हणाले, “या महोत्सवाने राज्यभरात विशेष स्थान निर्माण केले आहे. जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभव ठरलेल्या या महोत्सवाचे उत्तम व्यवस्थापन हे खास वैशिष्ट्य आहे. या महोत्सवाची संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती असून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद ही आणखी एक जमेची बाजू आहे. गेल्या पंचवीस वर्षांत महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा येथील नामवंत नाट्यसंघांनी या महोत्सव स्पर्धेत नाटके सादर झाली ‘

नामवंत नाट्यसंघांनी या महोत्सव स्पर्धेत नाटके सादर केली. महोत्सवात सहभागी संघास निर्मिती सहाय्य देण्यात येते. यावर्षी या महोत्सवात एकूण ३२ संघ सहभागी झाले आहेत. यातून २० संहितांची प्रत्यक्ष तालिम अमित देसाई व केदार सामंत यांच्या निवड मंडळाने बघून अंतिम फेरीसाठी सात नाटकांची निवड केली होती. यावर्षी महोत्सवाचे उद्घाटन बाबा वर्दम रंगमंच, कुडाळ हायस्कूल येथे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी थिएटर्सच्या उपाध्यक्षा वर्षा वैद्य होत्या यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक चंदू शिरसाट,सारस्वत बँकेचे संचालक सुनील सौदागर यांची प्रमुख उपस्थिती होते. महोत्सवात सायंकाळी साडेसातला सुरू होणाऱ्या या नाटकांचा आस्वाद रसिकांनी घेतला.असे आवाहन थिएटर्सचे अध्यक्ष विलास कुडाळकरहे महोत्सवा यशस्वी होण्याची खूप मेहनत घेतात.

या महोत्सवात महोत्सवात ‘राक्षस’ (ध्यास, पुणे), ‘फड’ अस्तित्वाचा (यंग चॅलेंजर्स, सोलापूर), उद्ध्वस्त ‘धर्मशाळा’ (तालिम थिएटर्स, मुंबई), ‘व्हय, मी सावित्रीबाई’ (अंजोर कम्युनिकेशन्स, मुंबई), ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा!’ (अखिल मराठी नाट्यविद्या मंदिर समिती, सांगली), ‘ऋणानुबंध’ (कलावलय, वेंगुर्ले), भिंती (वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान)या नाट्यसंघानी सादर केली.

सध्या पुढील कार्यकारी मंडळ आहे.अध्यक्ष – विलास कुडाळकर

उपाध्यक्ष – वर्षा वैद्य

कार्यवाह – केदार सामंत

संस्थापक – शंकरभाई वर्दम, वामनराव पाटणकर, चंदु शिरसाट, प्रकाश पाटणकर, विलास कुडाळकर, सुभाष टोपले, मनोहर ओटवणेकर, शरद ओटवणेकर, गुरु दिवाडकर, बाळ बिर्जे

++

संपूर्ण कोकणातील ही अशी एक नाट्यसंस्था आहे. एका रंगकर्मीच्या स्मृतीप्रितर्थ सातत्याने नाट्यमहोत्सव आयोजित करते.

बाबा वर्दम यांचे निधन २एप्रिल १९७५ रोजी वयाच्या ६६ व्या वर्षी झाले.याला आता ४७-४८वर्षे झाली पण कुडाळकर नागरिकांनी या महान ‘सिंधुरत्ना’ ला आपल्या हृदयपटलावर आजही जपून ठेवलय.. असे भाग्य काही कलावंताच्याच वाट्याला येते नाही का?

“रंगभूषामहर्षी म्हणून ओळखले जाणारे श्री. बाबा वर्दम हे

चित्रपट रंगभूमीवरील सुप्रसिद्ध रंगभूषाकार होते. समर्थ

कलामंत्रांनी रंगभूमी सजीव व सुंदर करणाऱ्या बाबांनी

रंगभूषा कलेत कुडाळ नगरीचे नाव भारतीय कलाक्षेत्रात मोठे

करून ठेवले आहे २ एप्रिल १९७५ ला बाबांचे देहावसान

झाल्यानंतर नाट्यकला जोपासण्यासाठी त्यांचेच नाव धारण करून ‘बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ’ ही कोकण रंगभूमीवर प्रकर्षाने चमकणारी पहिली हौशी नाट्यसंस्था निर्माण झाली.” रंगदेवच्या या तपस्वी सिंधुरत्नाला मानाचा मुजरा.!

 

——————————-

संदर्भ –

१. राकेश वर्दम यांचा समाजमाध्यमावरील लेख /चर्चा

२.समाजमाध्यमातून काही नोंदी .