फोंडाघाट वाहतूक कोंडी -सरपंच ॲक्शन मोडवर !

रस्त्यावर बसणाऱ्यांना समज ! अन्यथा दोन दिवसांनी कारवाई 

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज बाजारपेठेमध्ये ग्रामपंचायत सरपंच सौ. संजना आग्रे यांचे बरोबर ग्रामपंचायत सदस्य पवन भोगले, अनिकेत पारकर ,अमित चव्हाण, पिंटू पटेल, मिलिंद लाड, ग्रामसेवक विलास कोलते व कॉन्स्टेबल वंजारे यांचे सह कर्मचारी बाळा कुबल, भार्गव लाड, यांनी अचानक पायी फेरी काढून पाहणी केली. रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना गटारावरील पथ रस्त्यावर बसण्याच्या सूचना केल्या. रस्त्यावरील उभ्या दुचाकी- चार चाकी- रिक्षा- टेम्पो- ट्रक इत्यादींच्या दुकानदारांना व चालकांना सुधारणा करण्याच्या सूचना करताना, बदल न झाल्यास दोन दिवसानंतर, रोज बेशिस्त वागणुकींनी वाहतूक कोंडी करणाऱ्या वर,जप्तीची कारवाई ग्रामपंचायत कडून करण्यात येईल,अशी समज दिली.

नुकतीच वाहतूक कोंडी या विषयावर पेठेतील भाजी विक्रेते, व्यापारी, स्टॉल धारक,हॉकर्स यांची ग्रामपंचायत सभागृहात बैठक झाली होती. त्यामध्ये गणेश चतुर्थीला सर्व स्तरातून पेठेमध्ये गर्दी होणार असल्याने, आपल्या दुकानापुढे वाहने जाऊ देऊ नका. रस्त्यावर बसू नका .जेणेकरून वाहतूक कोंडी होईल. यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच सौ. संजना आग्रे यांनी केले.उपस्थित व्यापारी-रिक्षा चालक, भाजी विक्रेते, हॉकर्स यांनी सुद्धा या गोष्टीला सहमती दर्शवली.

सणासुदीसह इतर वेळी फोंडाघाट बाजारपेठेतील वाहतूक कोंडी सर्वांचीच डोकेदुखी झाली आहे.यामध्ये विक्रेते,रिक्षा आणि बांधकामाचे साहित्य तसेच दुचाकी-टेम्पो- माल चढ-उतार करणारी ट्रक वाहने आणि त्यांची बेशिस्त बेपरवाही कारणीभूत आहे.दोन ओढ्यांच्या मध्ये वसलेल्या फोंडाघाट उतारपेठेवर-बाजारपेठेवर, त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. चालणे ही मुश्किल झाले आहे.वाहतूक कोंडी कायमची सोडविण्यासाठी उपाय म्हणून पेठेच्या दुतर्फा पादचाऱ्यांसाठी प्लॅटफॉर्म – पथवाट ठेवून रस्ता रुंदीकरणाचा घाट घालण्यात आला. त्यासाठी १ कोटी ७७लाखाचे कामही सुरू झाले. मात्र झालेल्या कामावरच अनधिकृत बांधकामांना ऊत आला.गटारावरील प्लॅटफॉर्म वर विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली. तर रस्ता रुंदीकरणाचा वापर वाहने पार्किंग साठी सर्रास होत आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासल्याचे चित्र दिसत आहे. रस्त्याने ये-जा करणाऱ्या बांधकाम विभाग, पोलीस यंत्रणा, ग्रामपंचायत अधिकारी-सदस्य अथवा कर्मचारी याकडे डोळेझाक करताना लोकांच्या चर्चेचा विषय होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांची पथफेरी बाजारपेठेतील व्यापारी हॉकर्स-विक्रेते आणि वाहनधारक किती मनावर घेतात, यावरच किमान गणेशोत्सव काळात फोंडाघाटची वाहतूक कोंडी सुटण्याची शक्यता आहे…..