राजापूर (वार्ताहर): आई आधार केंद्र’ व ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ, ओणी आयोजित कै. पार्वतीबाई शंकर तुळसणकर जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेच्या 5 ते 7 वी गटात आदर्श विद्यामंदिर वाटुळच्या कु. आर्या यादव हिने प्रथम तर 8 ते 10 वी गटात युनाइटेड स्कूलच्या कु. स्वरांगी जोशी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ही स्पर्धा नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, ओणीच्या शहाजी भाऊराव खानविलकर सभागृहात पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अड. वासुदेव तुळसणकर हे होते.
या स्पर्धेचे हे सलग 4 थे वर्ष होते. गंगाधर तुळसणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व श्रीराम तुळसणकर यांच्या हस्ते आईच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गंगाधर तुळसणकर यांनी कै. पार्वतीबाई तुळसणकर यांच्या सहवासातील काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, ‘आपल्या मुलांना उत्तम शिक्षण व चांगले संस्कार मिळावे यासाठी सदैव त्या प्रयत्नशील होत्या’ हे प्रकर्षाने नमूद केले.
सुनबाई सौ. राजश्री नामदेव तुळसणकर यांनी सासूबाईंच्या जीवनावर आधारित स्वरचित ‘आई’ कविता सादर केली. सासूबाईंना आम्ही ‘ए, आई’ अशीच हाक मारत असू. त्यामुळे आमच्यातील नाते हे सासू-सुनेचे नसून माय-लेकींचे होते असे त्यांनी सांगितले.
‘जिल्ह्यातील मुलांना सुंदर व्यासपीठ मिळावे’ यासाठी या स्पर्धेचे आयोजन केलेले असून स्पर्धकांच्या वाढत्या प्रतिसादावरून ते सहज लक्षात येते असे वासुदेव तुळसणकर यांनी या स्पर्धेच्या उद्घाटनपर अध्यक्षीय भाषणात सांगितले.
या स्पर्धेला जिल्हाभरातून इ. 5 वी ते 7 वी लहान गटामध्ये 23 तर 8 वी ते 10 वी या मोठ्या गटामध्ये 36 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आकाश पाटील, प्रा. सचिन टेकाळे, डॉ. शंकर जाधव, रोहन आदमापुरे यांनी काम पाहिले.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे: लहान गट – इ. 5 वी ते 7 वी प्रथम क्रमांक- आर्या उदय यादव – आदर्श विद्यामंदिर, वाटुळ, द्वितीय क्रमांक- खुशी विश्वास केळकर – रा. भा. शिर्के प्रशाला रत्नागिरी; तृतीय क्रमांक – मिहीर विजयानंद भुवड – दलवाई हायस्कूल, मिरजोळी.
मोठा गट – इ. 8 वी ते 10 वी प्रथम क्रमांक – स्वरांगी प्रमोद जोशी – युनायटेड इंग्लिश मिडीयम स्कूल, चिपळूण; द्वितीय क्रमांक – अभिनव रमेश कांबळे – रुक्मिणी भास्कर विद्यालय, व्हेळ, तृतीय क्रमांक- स्वानंदी गिरीश शेंबवणेकर – रा. भा. शिर्के प्रशाला, रत्नागिरी.
व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत नामदेव तुळसणकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख शैलेश शिंदेदेसाई यांनी केले. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष प्रदीप संसारे, उपाध्यक्ष अरविंद गोसावी, कार्यवाह गणपत जानस्कर, गणपत भारती, हेमचंद्र पाभरेकर, चंद्रकांत आंगवलकर, डॉ. महेंद्र मोहन, नारायण आंग्रे, प्रमोद लिमये, अशोक ब्रीद व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद मिरगुले यांनी तर आभार सचिन जाधव यांनी मानले.











