ओटव नांदगाव शाळेत आजी- आजोबा दिवस उत्साहात संपन्न!

मसुरे | झुंजार पेडणेकर :जिल्हा परिषद शाळा ओटव नांदगाव येथे आजी – आजोबा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सावित्री परब, शांताराम गोसावी,अशोक मांजरेकर, उज्वला मांजरेकर यांनी बालपणातील खेळ, लहानपणी खाल्ल गेलेल अन्न, कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नसताना लहानाचे मोठे कसे झालो याबाबत मार्गदर्शन केले.

कुटुंब व्यवस्था अबाधित रहावी यासाठी शासनाच्या वतीने प्रत्येक शाळेमध्ये आजी आजोबांचा सन्मान करून त्यांनी केलेले संस्कार बाळकडू आताच्या मुलांना मिळावा, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आजी आजोबा दिवस शाळेत साजरा करा असा निर्णय घेण्यात आला आहे. लहानाचे मोठे केलेली मुले आपल्याला वृद्धाश्रमात टाकून वेगळे होतात यावर कुठेतरी आळा बसावा हाही एक उद्देश यामागे आहे. या उपक्रमामध्ये सावित्री परब,शांताराम गोसावी,अशोक मांजरेकर, उज्वला मांजरेकर, आदींनी सहभाग घेतला. सावित्री परब या आजीने अभ्यासक्रमात असलेले श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता मुलांसमोर सादर केली. यावेळी राजश्री धुमाळ, नार्वेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष परब मॅडम, बांदिवडेकर, शांताराम गोसावी यांनी विद्यार्थ्यांना विठी दांडू कशी करावी याचेही प्रात्यक्षिक करून दाखविले. छोटे छोटे खेळ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.आजी आजोबांना शाल आणि पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. स्वागत मुख्याध्यापक आनंद तांबे आणि कार्यक्रमाचे निवेदन आणि आभार श्रीमती रूपाली मॅडम यांनी मानले.