मंगळवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाची लगबग सुरू

मुर्ती शाळा सज्ज, बाजारपेठ सजली, घरा-घरात तयारी सुरू

राजापूर (वार्ताहर): अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचे वेध साऱ्यांना लागले आहेत. घरा घरात साजरा होणाऱ्या या गणेशोत्सवाची लगबग घरोघरी आणि गणेशमूर्ती शाळांतही सुरू झाली आहे. गणपती मुर्ती काम आता अंतीम टप्यात आले असून मुर्त्यांचे रंगकाम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. तर गणेशोत्सवाच्या सजावटीच्या साहित्यांनी राजापूर बाजारपेठ सजली असून आपल्या लाडक्या बाप्पाच्या मनोजोगत्या सजावटीसाठी बाजारात गणेश भक्तांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे.

यावर्षी मंगळवार १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्याने राजापूर शहरासह तालुक्यातील गणेश चित्रशाळा आता गजबजून गेल्या आहेत. शहरातील तांबट, कोठारकर, मांडवकर, कडू, रहाटे यांच्या मूर्तीशाळांत एकच लगबग सुरू झाली आहे. सर्वसाधारणपणे जून जुलै पासून सुरू झालेली लगबग आता अंतीम टप्यात आली आहे. शहरातील वरचीपेठ येथील मूर्तीकार तांबट बंधुंच्या मुर्तीशाळेला भेट दिली असता नव्व्द टक्के काम मार्गी लागले आहे. उर्वरीत रंगकाम, कलाकुसरीची कामे हाती घेण्यात आली आहेत.

तांबट कुटुंबिय गेली अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करत आहेत. या व्यवसायात आता तीसरी पिढी कार्यरत आहे. मुर्तीवर रेखीवपणा व रंगकामातील कौशल्यामुळे त्यांच्याकडील मूर्तीना गणेश भक्तांची मोठी मागणी आहे. यावर्षी त्यांनी शाडुंच्या मुर्त्याबरोबर पीओपीच्या मुर्त्याही बनविल्या आहेत. यावर्षी साडेतीनशे मुर्त्यांची मागणी असून राजापूर तालुक्याबरोबर मालवण, कुडाळ, कोल्हापूर या ठिकाणीही त्यांच्या मुर्त्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.दिवसागणीक वाढणारे माती, रंगसाहित्य व साहित्याचे भाव यामुळे यावर्षीही किंमतीत वाढ होणार आहे. तांबट कुटुंबिय गणपती मुर्तीच्या अंतीम तयारीत व्यस्त झाल्याचे पाहायला मिळते.

अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या या उत्सवामुळे आपल्या लाडक्या बाप्पाची आगमनाची उत्सुकता आता साऱ्यांनाच लागून राहिली आहे. घराघरात रंगरंगोटी, साफसफाईची लगबग सुरू झाली आहे. तर शहर बाजारपेठेतील दुकाने विविध सजावटीच्या वस्तुंनी फुलुन गेली आहे. मखरासाठी लागणारे पडदे, इलेक्ट्रीक व इलेक्ट्रानिक्स वस्तु, रंग साहित्य, कलाकुसरीचे साहित्य, माळा, तयार मखरे, अगरबत्ती, कापूर, फळे अशा सर्व प्रकारच्या वस्तुंनी बाजारपेठ फुलून गेली आहे. सर्वत्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे.