फोंडाघाट बाजारपेठ गजबजली, मात्र प्रचंड महागाईचे सावट !
वाहतूक कोंडीची डोकेदुखी ! व्यापारी- पोलीस- ग्रामपंचायत हतबल. सीसीटीव्ही बंद
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागताला वाडीवाडीवरील कोकणी माणूस आसुसलेला आहे. गेले आठ-दहा दिवस घराची साफसफाई, मातीची लिंपण, रंगरंगोटी, परसवाची स्वच्छता यामध्ये येथील माणसे व्यस्त होती. आणि आता दोन दिवसात लाडक्या गणरायाचा आगमन होणार, मुलं- सुना- नातवंड- नातेवाईकांनी घरभाट गजबजुन जाणार, या कल्पनेने गावातील घरातील मंडळी आनंदुन वाट पाहत आहेत. गणपती रंग शाळा रात्र जागवत असून ,कलाकार-मूर्तिकार आपला शेवटचा हात गणपती मूर्तीवर सफाईदारपणे फिरवीत आहेत.
शनिवारीच नमो आणि मोदी एक्सप्रेसने कोकण कडे प्रयाण केले. एस. टी. महामंडळ,रेल्वेज,खाजगी गाड्या सोमवार पर्यंत चाकरमान्यांना घेऊन येत आहेत .त्यामुळे रविवारी आणि सोमवारी ऋषिपंचमीला फोंडाघाट बाजारपेठ, चाकरमानी आणि स्थानिक अबालवृद्ध, महिला पुरुषांनी गजबजलेली पहावयास मिळत आहे. एसटी स्टँडवर प्रवाशांची एकच वर्दळ आहे. त्यालाच लागून बाजारपेठेमध्ये फळ विक्रेत्यांचा, ग्राहकांना आकर्षित करणारा स्टॉल, लक्ष वेधून घेत आहे. पेठेमध्ये गणरायाच्या प्रसादाची, मोदक, लाडू, कापूर-उदबत्ती- धुप-फुलवाती यांची दुकाने जागोजागी पहावयास मिळत आहेत .सह्याद्रीचा फुलोरा- कांगणे, कौंडाळी,हरणे,तिरडे, शिरवाडे, बेडे यांचे विक्रेते जागोजागी बसलेले दिसतात .मात्र त्यांचे दर सुद्धा महागाई प्रमाणे ग्राहकांच्या आवाक्या बाहेर असल्यामुळे, गजाननाची मंडपी शास्त्रापूर्ती सजवण्याचा ग्राहक विचार करीत आहेत .
विविध मनमोहक हार ,वेलबुट्टी, मागील आकर्षक पडदे आणि फटाके यांची दुकाने साहित्याने झाकोळली असून, व्यापारी, ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. लाईटची मनमोहक रोषणाई लोकांना वेधून घेत आहे. किराणा मालाचे दुकानदार,ग्राहक- भांडार, शेतकरी संघाचे दुकान मध्ये वाणसामान भरण्यासाठी लोकांची एकच गर्दी दिसून येत आहे. तर पंढरपूरहुन आलेल्या नाल- मृदंग- तबला दुरुस्तीची दुकाने, आरतीच्या- भजनाच्या मेळ्यासाठी अहोरात्र झटत आहेत .मात्र या सगळ्या बाबीवर प्रचंड प्रमाणात वाढलेल्या महागाईचे सावट सर्वत्र दिसून येत आहे.
प्रसंगी ‘ऋण काढून– सण साजरा करणाऱ्या–‘ आणि उत्साहाने आपली सारी दुःख-अडचणी बाजूला ठेवून, सणाला सामोरे जाणाऱ्या,कोकणी माणसाची वृत्ती आजही पाहायला मिळत आहे. चाकरमानी मात्र स्थानिक बाजारपेठेत भाजी दूध इत्यादी जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना दिसतात .इतर खरेदी मात्र मुंबईहूनच करीत असल्याने बाजारपेठेत गजबज वर्दळ असूनही, येथील व्यापारी मात्र नाराज असल्याचे दरवर्षीप्रमाणे पहावयास मिळत आहे.
रविवार पासून चाकरमानी गावोगावी वाड्या वाड्यावर येऊ लागल्याने, रिक्षा चार चाकी, टेम्पो, ट्रकची वर्दळ वाढली असून फोंडाघाट बाजारपेठेत वाहतूक कोंडी होत आहे. ग्रामपंचायतीने नियोजन करून ही सुरक्षित घाटाने होणारे वाढते ट्राफिक, यामुळे होणारी वाहतूक कोंडी व्यापारी- ग्राहक , सर्वांची डोकेदुखी ठरत आहे. पोलीस यंत्रणा त्यामुळे हतबल झाली आहे. त्यातही गेली अनेक वर्षे पेठेतील सीसी टीव्ही बंद पडले असून,त्याकडे संबंधितांनी लक्ष न दिल्याने, त्याचा फटका वाहतूक सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित करणे वर होत आहे. त्यामुळे ‘जे जे होईल ते ते पाहावे–‘ अशी आलबेल अवस्था फोंडाघाट बाजारपेठेतील असली तरी गणरायाच्या स्वागताचा उत्साह, चैतन्य आणि भजनाचे सूर,पारंपारिक गणेशोत्सव समृद्ध करेल असा प्रत्येकाला विश्वास वाटतो….











