गणेश चतुर्थी निमित्त रासाई दुध संस्थेची शेतकऱ्यांना भेट
वैभववाडी | प्रतिनिधी : करुळ येथील रासाई देवी दुग्ध उत्पादक संस्थेच्या वतीने दुध उत्पादक शेतकऱ्यांना गोडे तेल व गुळाचे वाटप करण्यात आले. चतुर्थी सणानिमित्त सभासदांना ही भेट देण्यात आली आहे. रासाई देवी दुग्ध उत्पादक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन दिगंबर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला सरपंच नरेंद्र कोलते, माजी पंचायत समिती सदस्य काळा कदम, विवेक कदम, माजी सरपंच हिंदुराव पाटील, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र पवार, व्हा. चेअरमन दत्ताराम साटम, दत्ताराम कदम, सुभाष पाटील, श्री तावडे, श्री तळेकर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांना बोनसरुपात पाच लिटर गोडे तेल, गुळाची ढेप, मोदक बॉक्स, अगरबत्ती पुडा आदी साहीत्याचे मोफत वाटप करण्यात आले.
शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून संस्था कार्यरत आहे. शेतकऱ्यांचे दूध उत्पादन वाढावे आणि त्यातून त्यांना आर्थिक सुबत्ता यावी, यासाठी ही संस्था सर्व शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी राहील. असे संस्थेचे चेअरमन दिगंबर पाटील यांनी सांगितले. संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी दूध उत्पादित शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम घेतले जातील. तसेच त्यांना सर्वतोपरी सरकार्य केले जाईल असे श्री पाटील यांनी सांगितले. युवा शेतकरी प्रथमेश गजानन पाटील व सचिन सुभाष पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक रामकृष्ण कोलते यांनी तर आभार हिंदुराव पाटील यांनी मानले.











