11 जणांचा ग्रुप समुद्र किनारी फिरायला आला असताना घडली दुर्घटना
मालवण | प्रतिनिधी : तारकर्ली पर्यटन केंद्रासमोरील समुद्र किनारी फिरण्यासाठी आलेल्या सुफियान दिलदार शेख (वय 23) रा. साकेडी मुस्लिमवाडी कणकवली या युवकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुफियान याचा मृतदेह बुधवारी सकाळी वायारी जाधववाडी समुद्रकिनारी सापडून आला. दरम्यान याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साकेडी मुस्लिमवाडी कणकवली येथील शावेझ रियाझ शेख व चुलत भाऊ सुफियान दिलदार शेख तसेच झेद अब्दुल्ला शेख, मतीन हारूण शेख, अरबाज इम्तियाझ शेख रा. साकेडी मुस्लिमवाडी कणकवली आणि शहीद इरफान शेख, साहिल इरफान शेख, उस्मान हनिफ काझी, कतिल नाझीम काझी, युसूफ मुस्ताक काझी सर्व रा. मुस्लिम वाडी हुमरठ ता. कणकवली आणि मतीन याचा मित्र मेहबूब बाबु नदाफ सध्या रा. नलावडे चाळ शिवाजी नगर कणकवली असे एकूण 11 जण मंगळवारी सायंकाळी मालवण समुद्र किनारी फिरण्यासाठी मोटारसायकलने तारकर्ली पर्यटन केंद्र येथे आले होते.
सायंकाळी ते समुद्र किनारी हॉलि्बॉल खेळत होतो. त्यावेळी सुफियान शेख व अरबाज शेख समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. काही वेळात साहिल शेख याने आरडा ओरडा करून समुद्रात उतरलेले दोघेही पाण्यात वाहून जात असल्याचे सांगितले. सर्व त्या दिशेने गेलो मतीन शेख, उस्मान काझी त्या दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरले. अरबाज शेख याला पाण्यातून बाहेर काढले. त्यावेळी मतीन हा ही बुडू लागला मात्र पाण्याच्या लाटेत किनाऱ्यावर फेकला गेल्याने बचावला. मात्र सुफियान हा समुद्राच्या पाण्यात आत वाहून गेला. त्याचा शोध सुरु होता. पाण्यात बुडालेल्या अरबाज व मतीन या दोघांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. डाक्टरांनी उपचार केले. मात्र अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सुनील जाधव, सुभाष शिवगण, धोंडू जानकर व अन्य घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील कार्यवाही सुरु होती.
बुधवारी सकाळी मृतदेह सापडला
मंगळवारी समुद्रात बुडालेल्या सुफियान शेख याचा शोध सुरु होता. तारकर्ली किनाऱ्या लगत वायरी जाधववाडी समुद्रकिनारी बुधवारी सकाळी सुफियान याचा मृतदेह सापडून आला. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात प्राप्त माहिती नुसार आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास मालवण पोलीस करत आहेत.












