Chandraayaan 3 : आज जागं होणार का ‘चांद्रयान-3’चं लँडर-रोव्हर? मिळतोय अगदी कमकुवत सिग्नल – रिपोर्ट

4 सप्टेंबर रोजी निद्रावस्थेत गेलेलं चांद्रयान-3 चं विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे आज पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. चंद्रावर सूर्योदय झाला असल्यामुळे हे दोन्ही डिव्हाईस पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

मात्र, चांद्रयानाकडून सध्या मिळत असणारे सिग्नल अतिशय कमकुवत असल्याचा दावा अ‍ॅस्ट्रोनॉमर स्कॉट टाईली यांनी केला आहे.

एक्स पोस्ट थ्रेडच्या माध्यमातून स्कॉट यांनी याबाबतची माहिती दिली आहे. युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) सातत्याने चांद्रयानाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे

गेल्या काही तासांपासून स्कॉट याबाबत सातत्याने अपडेट्स देत आहेत. चांद्रयान-3 मधून मिळणारे सिग्नल हे सातत्याने कमी-जास्त होत आहेत. अर्थात, ESA किंवा इस्रो यांपैकी कोणीही याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे रोव्हर-लँडर पुन्हा जागं झालं आहे की नाही याबाबत अजूनही स्पष्टता मिळाली नाही..

शिवशक्ती पॉइंटवर पोहोचला सूर्यप्रकाश

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रावर सध्या विक्रम लँडर असणाऱ्या शिवशक्ती पॉइंटवर सूर्यप्रकाश पडत आहे. हा सूर्यप्रकाश 13 डिग्री या अँगलने पडत आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे दोन्ही डिव्हाईस 6 ते 9 डिग्री अँगलच्या सूर्यप्रकाशामध्ये काम करू शकतात. त्यामुळे अजूनही हे दोन्ही जागे होण्याची शक्यता आहे.

मिशन झालंय पूर्ण

चांद्रयान-3 मोहिमेचा कालावधीच 14 दिवसांचा होता. त्यामुळे 23 ऑगस्ट रोजी लँड झाल्यानंतर पुढील दोन आठवड्यांमध्ये विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने आवश्यक तो डेटा पाठवला आहे. यामुळे हे मिशन पूर्ण झाल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे. अर्थात, हे चांद्रयान पुन्हा सुरू झाल्यास आणखी डेटा मिळणार आहे.