खेड मध्ये ३२ गावात रिक्त पोलीस पाटील पदाना उमेदवार मिळेना!

सर्वाधिक महिला पदासाठी आरक्षण , २५ सप्टेंबर पर्यत मुदतवाढ 

देवेंद्र जाधव  l खेड : गावात निर्माण होणारे तंटे बखेडे सोडवण्यासाठी प्रशासनाकडून पोलीस पाटील हे पद निर्माण करण्यात आले आहे मात्र खेड तालुक्यात ३२ गावांमध्ये रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदासाठी उमेदवारच मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली असून सर्वाधिक पदेही महिला यांच्यासाठी आरक्षित असल्याने या पदांबाबत उमेदवारच प्रशासनाला उपलब्ध न झाल्याने प्रशासना समोर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

खेड तालुक्यात रिक्त असलेल्या १०२ पोलीस पाटील पदांसाठी अर्ज मागवण्यात आले असता ७० गावातील उमेदवारांनीच अर्ज सादर केले. ३२ गावात पोलीस पाटील पदांसाठी एकही अर्ज प्राप्त न झाल्याने प्रांताधिकारी राजश्री मोरे यांनी अर्ज भरण्यास २५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

तालुक्यात १०२ पोलीस पाटील पदांसह ८ कोतवालांच्या रिक्त पदांसाठी आरक्षण सोडत काढून अर्ज मागवले होते. त्यानुसार केवळ ७० गावातील उमेदवारांनी अर्ज सादर केले. उर्वरित ३२ गावातील पोलीस पाटील पदांच्या भरतीसाठी ७ सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र या कालावधीतही ३२ गावातील एकाही उमेदवाराने अर्ज सादर केलेला नाही.

रिक्त असलेल्या ३२ गावातील पोलीस पाटील पदासाठी येथील प्रांत कार्यालयाकडून प्रसिद्ध पत्र काढून पद भरण्याचे आवाहन करण्यात आले होते यासाठी सर्वसामान्य नागरिकांना यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले होते मात्र या प्रक्रियेला बराच कालावधी लोटून देखील तरी अद्यापी ही पदेच भरली गेली नाहीत किंबहुना या पदांसाठी योग्य उमेदवारच गावातून उपलब्ध न होत असल्याने ही पदे सद्यस्थितीत रिक्त आहेत

गावात निर्माण होणारे तंटे बखेडे गाव स्तरावर निपटून निपटारा करण्यासाठी पोलीस पाटील हे मध्यस्थीची भूमिका पार पाडत असतात यामुळे गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मदत होत असते मात्र तालुक्यातील ३२ गावांमध्ये सध्या पोलीस पाटील हे पद रिक्त असल्याने प्रशासना समोर देखील अडचण निर्माण झाले आहे ही पदे भरण्यासाठी २५ सप्टेंबर पर्यंत आता पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे

दरम्यान खेड तालुक्यातील फुरुस आमशेत सगलट बौद्धवाडी आयनी या गावांसाठी अनुसूचित जाती महिला हे पद आरक्षित आहे कुरवळ गावठाण अनुसूचित जाती प्रवर्ग होडखाड खुर्द अनुसूचित जाती प्रवर्ग वावे तर्फे नातू अनु जाती प्रवर्ग , पोसरे बुद्रुक, खोपी, शिरगाव करिता अनुसूचित जमाती महिला हे आरक्षण आहे

वडगाव खुर्द,धवडे, भरणे नाका , आंबये, किंजळे तर्फे खेड साठी अनुसूचित जमाती प्रवर्ग हे आरक्षण आहे सुकीवली , दाभिळ साठी विमुक्त जाती अ महिला हे आरक्षण आहे जाबुरडे, केळणे, घेरा सुमारगड साठी भटक्या जमाती क प्रवर्ग महिला हे आरक्षण आहे तसेच झगडे वाडी , उधळे बुद्रुक , कुरवळ जावळी साठी इतर मागास प्रवर्ग , फुरुस इतर मागास प्रवर्ग महिला , चोरवणे उतेकर वाडी संगलट मोहल्ला आर्थिकदृष्ट्या दुरबल घटक प्रवर्ग , जावळी गावठाण, आष्टी मोहल्ला, चौगुले मोहल्ला ,कळंबणी खुर्द , आष्टी बुद्रुक साठी सर्वसाधारण महिला हे पद आरक्षित आहे तर अलसुरे खुर्द, करजी बुद्रुक साठी सर्वसाधारण हे आरक्षण आहे