मराठी पाट्या लावा; अन्यथा याद राखा- राजू खेतले

चिपळुणात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत

चिपळूण (प्रतिनिधी) : ‘राज ठाकरे साहेब झिंदाबाद… महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो…’ अशा जोरदार घोषणा देत मनसे वाहतूक सेनेने मंगळवारी मराठी पाट्या लावण्यासंदर्भातील निर्णयाचे स्वागत करीत आनंदोत्सव साजरा केला. शहरातील बहादूरशेख नाका येथे एकत्र जमलेल्या पदाधिकाऱ्यांनी हातात मनसेचे झेंडे घेत फटाक्यांची आतषबाजी केली. या निर्णयाची सर्वत्र अंमलबजावणी व्हावी, अशी इच्छा व्यक्त करतानाच मराठी पाट्या नाही लावल्यात तर याद राखा, असा इशाराही वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात राहता तर दुकाने व अस्थापना यावर मराठी पाट्या लावाव्यात यासंदर्भात गेली कित्यकेक वर्षे मनसे लढा देत आहे. काही व्यापाऱ्यांनी हा विषय सुप्रीम कोर्टात नेला होता. मात्र यावर आता सुप्रीम कोर्टाने निर्णय देत पुढील दोन महिन्यात महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापना यांच्यावर मराठी पाट्या लागल्याच पाहिजेत असा स्पष्ट निकाल दिल्याने मनसेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या निर्णयाचे स्वागत करीत सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. त्यानुसार चिपळूण तालुक्यातही या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. मनसे वाहतूक शाखेचे जिल्हाध्यक्ष खेतले यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष मिलिंद कदम, माजी तालुका सचिव सुनिल मोडक, माजी विभाग अध्यक्षा सुनिल उर्फ भाई कदम, संतोष महाडिक, प्रमोद महाडिक, संजय वाजे, रमेश जोईल, विजय सकपाळ, रुपेश शेट्ये, अनिल डांगरे, नाना डोळस, गजानन राक्षे, संतोष सुर्वे, सागर गांधी, सुनिल घाडगे, चिराग कदम आदी मनसैनिकांनी मनसेचे झेंडे फडकवित बहादूरशेख नाका येथे जोरदार घोषणा दिल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष खेतले म्हणाले की, आता न्यायालयानेच आदेश दिला आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाने या आदेशाचे पालन करावे. नगर पालिका अथवा अन्य प्रशासकीय यंत्रणेने यासंदर्भात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा आम्ही आहोत. आता कशा मराठी पाट्या लागत नाहीत आणि त्यावर प्रशासन कशी कारवाई करीत नाही तेच आम्ही बघू, असा इशारा देताना मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्या राज साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आणि न्यायालयाचे आभार मानतो असे स्पष्ट केले.