स्वच्छता ही सेवा..1 तारीख 1 तास’

संततधार पावसात अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून परिसर स्वच्छता

संतोष कोत्रे l लांजा : स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘1 तारीख 1 तास’ ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमात एका हातात छत्री दुसऱ्या हातात झाडू घेऊन संततधार पावसात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लांजा तहसील कार्यालय परिसर, मुंबई गोवा महामार्ग तसेच साटवली रोड व पोलीस वसाहत परिसराची स्वच्छता केली.

रविवारी पावसाची संततधार सुरु असतानाही, तालुका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी लांजा तहसील कार्यालय येथे आज जमा झाले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे,तहसीलदार प्रमोद कदम,पंचायत समिती गट विकास अधिकारी संतोष म्हेत्रे,नायब तहसीलदार उज्वला केळुस्कर ,पोलीस निरीक्षक दादासाहेब गुटूकडे, तालुका पुरवठा अधिकारी शितोळे यांच्यासह विविध शासकिय खात्याचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

लांजा तहसील कार्यालय परिसर, मुंबई गोवा महामार्ग तसेच साटवली रोड, बसस्थानक, पंचायत समिती, पोलिस वसाहत व येथील संकल्प सिद्धी सभागृह परिसर आदी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रेनकोट, छत्री यांच्या सोबतीने झाडू, फावडे आदी साधनांच्या सहायाने परिसराची स्वच्छता करण्यात आली. प्लास्टिक बाटल्या, कागदी पिशव्या, अनावश्यक वाढलेले गवत आदी कचरा साफ करुन लांजा नगर पंचायतीच्या गाडीमध्ये जमा करण्यात आला.