शहराच्या मुख्य रस्त्यावरच सात जणांनी एकाला केली बेदम मारहाण, शिवीगाळ
रत्नागिरी : प्रतिनिधी : रत्नागिरी शहरातील शांतता आणि सुव्यवस्था नेमकी गेली कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित करणारी घटना शनिवारी मध्यरात्री रत्नागिरीतल्या मुख्य रस्त्यावरच म्हणजेच जयस्तंभावर घडली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ध्वजस्तंभासमोर एकाला तब्बल सात जणांनी बेदम मारहाण केली असून याची चर्चा सध्या शहरात सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरकोळ कारणातून एका इसमाला तब्बल 7 जणांनी बेदम मारहाण करत शिवीगाळ केली आहे. हि घटना शुक्रवार 29 सप्टेंबर रोजी रात्री 12.30 वा.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटबाहेर ध्वजस्तंभाजवळ घडली.
पोलिसांनी मार खाल्लेल्याच नाव उघड केलं नाही.
मात्र फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार,26 सप्टेंबर रोजी ते टीआरपी येथील त्यांच्या बहिणीकडे आपल्या मुलीच्या औषधोपचारासाठी कुटूंबासह आले होते. दरम्यान,30 सप्टेंबर रोजी बहिणीचे पती मुंबईहुन येणार असल्यामुळे फिर्यादी त्यांना रेल्वेस्टेशन येथे घेण्यासाठी जात असताना बहिणीने त्यांना आईस्क्रिम आणण्यास सांगितले होते. बहिणीच्या पतीला रेल्वेस्टेशन येथून घेऊन फिर्यादी जयस्तंभ येथून आईस्क्रिमचे दुकान पहात जात असताना त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्यांच्या ओळखीचा तेजस शेट्ये (रा. साखरपा ) दिसला. फिर्यादीने त्याला गाडी थांबवून हाक मारत ‘तू कुठे जातोस’ असे विचारले. परंतु, तो गडबडीत दिसला.
त्याचवेळी तिथेच काही लोक उभे होते. त्यातील एकाने फिर्यादीला ‘काय रे तुझे काय काम आहे’ असे विचारले. त्यावर फिर्यादीने ‘तुझा काय संबंध’ असे बोलल्यावर विराज कुमठेकरने फिर्यादीची कॉलर धरून मान आवळत नाकावर, कपाळावर, चेहेऱ्यावर ठोसे मारले. त्यानंतर तिथेच उभे असलेले विराजचे मित्र सुद्धा तिथे आले आणि त्यांनी सुद्धा फिर्यादीला शिवीगाळ करत जबर मारहाण केली. या प्रकरणी विराज शेखर कुमठेकर (25,रा.कोकण नगर, रत्नागिरी ) आणि त्याचे 6 अज्ञात मित्रांविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.











