राजापूर (वार्ताहर): येथील राजापूर हायस्कुल व गोडे दाते कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावी व बारावी परिक्षेत सुयश संपादन करणाऱ्या पाच हुशार व गरजु विद्यार्थ्यांना नुकतेच कै. वसंत आठल्ये स्मृर्ती पुरस्कार देवून गौरविण्यात आले.शहरातील गुजराळी येथील आठल्ये परिवाराच्या वतीने कै. वसंत आठल्ये यांच्या स्मरणार्थ गतवर्षीपासून हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी राजापूर हायस्कुलमधुन इयत्ता १० वी परिक्षेत प्रथम आलेल्या कु. साक्षी रविंद्र शिंदे तसेच साक्षी सुरेश भोवड तसेच १२ वी परिक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या कु. गायत्री सुर्यकांत जडयार तसेच दिप्ती रमेश चौकेकर व योजना संतोष तरळ या विद्यार्थ्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळाचे सचिव जगदिश पवार, मुख्याध्यापक जगदीश भालशंकर, माजी मुख्याध्यापिका व समन्वयक सौ. मानसी हजेरी व उपमुख्याध्यापक श्री. पोवार यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.प्रतिकुल परिस्थीतीत शिकून यश प्राप्त करणाऱ्या मुलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आठल्ये परिवाराच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे श्रीमती वृषाली आठल्ये यांनी सांगितले.











