राजापुरात रविवारी घुमला स्वच्छतेचा नारा

प्रशासकिय अधिकारी, लोकप्रतिनधी नागरिक व सामाजिक संस्थांच्या सहभागातुन शहरात स्वछता

ग्रामीण भागातही विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम

राजापूर (प्रतिनिधी): राजापुरात रविवारी १ ऑक्टोबर रोजी “स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत शहरातील सार्वजनिक ठिकाणांसह आठ प्रभागांमध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सकाळपासून संततधार पडणाऱ्या पावसातही अधिकारी व नागरीकांनी मोठया उत्साहात या अभियानात सहभागी होत स्वच्छतेचा नारा दिला. या अभियानाचा शुभारंभ सकाळी १० वाजता जवाहर चौकात तहसीलदार सौ. शीतल जाधव, मुख्याधिकारी प्रशांत भोसले, राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे माजी नगराध्यक्ष जमिर खलिफे, भाजपाचे प्रदेश ओबीसी सेलचे सचिव अनिलकुमार करंगुटकर, स्वच्छता दुत महेश शिवलकर यांसह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

सोमवारी २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंतु असून त्यांच्या जन्मदिनाच्या पुर्वसंध्येला त्यांना आदरांजली वहाण्यासाठी रविवार १ ऑक्टोबर पासून देशभरात स्वच्छता पंधरवडा राबविला जात आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वच्छ भारत सुदंर भारत चा संदेश देत सुरू केलेल्या या अभियानातुन देश स्वच्छ आणि सुंदरतेकडे वाटचाल करत आहे.

राजापूर शहरातही या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांसह अधिकारी व कर्मचारी यांनी यासाठी नियोजन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. जवाहर चौकात स्वच्छतेची शपथ घेऊन व राष्ट्रगानानंतर शहरातील आठ प्रभागांमध्ये ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या स्वच्छता मोहिमेत पद्मभूषण नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सेवक तसेच आयटीआय कॉलेज राजापूर, नवजीवन हायस्कुल राजापूर, गुजराळी मराठी शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. हातिवले येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाटय सादर करून स्वच्छतेचा संदेश दिला. शहरातील या स्वच्छता मोहिमेत भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही उस्फुर्त सहभाग घेत स्वच्छता केली.

याप्रसंगी सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी, शहरातील नागरिक, महिला, नगर परिषदेचे मुख्य लिपीक जितेंद्र जाधव प्रशासकिय अधिकारी प्रताप ढोणे आदींसह सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. सकाळी संततधार पडणाऱ्या पावसातही या सर्वांनी एक तास स्वच्छतेसाठी देत स्वच्छतेचा जागर केला. मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी शहरात विविध प्रभागात निश्चित करण्यात आलेल्या स्वच्छता ठिकाणांना भेट देत या ठिकाणी स्वच्छता मोहिमेत सहभागी होत स्वच्छता मोहिमेत सहभागी नागरीकांचा उत्साह वाढवत सहभागाबद्दल त्यांना धन्यवाद दिले.

राजापूर तहसीलदार कार्यालयात तहसीलदार सौ.शीतल जाधव यांच्या नेतृत्वाखाली तर पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.शहरानजीकच्या शिळ येथे महिला बचत गट व महिलांच्या वतीने गावात विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागातही विविध गावांत व वाडीवस्तीवर ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.