मसुरे | झुंजार पेडणेकर
जि.प. प्राथमिक शाळा कांदळगाव नं. १ च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बेस्ट शिवहनुमान व्यायामशाळा, कांदळगाव आयोजित व श्री नंदकुमार दिनकरराव राणे पुरस्कृत ‘कै. दिनकरराव दौलतराव राणे (सुभेदार) स्मृती तालुकास्तरीय शालेय गीतगायन स्पर्धा ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता जि.प.प्राथमिक शाळा कांदळगाव नं.१ येथे होणार आहे.
ही स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथी, इयत्ता पाचवी ते सातवी, इयत्ता आठवी ते दहावी अशा तीन गटात होणार आहे. या स्पर्धेत प्रत्येक गटात प्रत्येक शाळेतून जास्तीत जास्त दोन स्पर्धक सहभागी होऊ शकतात. संगीत साथ अयोजकांमार्फत पुरविण्यात येणार असून स्पर्धकांनी मराठी भक्तीगीत, भावगीत, अभंग, नाट्यगीत, मराठी चित्रपट गीत, देशभक्ती गीत यापैकी एक गीत सादर करावयाचे आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. दि. ४ फेब्रुवारी पर्यंत नावे नोंदवावी. अधिक माहितीसाठी स्पर्धाप्रमुख प्रवीण पारकर (९४२०८२२५५३) यांच्याशी संपर्क साधावा. तालुक्यातील प्रत्येक शाळेने सहभागी व्हावे, असे आवाहन स्पर्धा पुरस्कर्ते नंदकुमार राणे, महोत्सव समिती अध्यक्ष प्रशांत पारकर, बेस्ट शिवहनुमान व्यायामशाळेचे अध्यक्ष उमेश कोदे, सचिव प्रवीण पारकर यांनी केले आहे.