वराड – सोनवडे पूलाच्या रखडलेल्या कामाविरोधात सरपंच, ग्रामस्थ आक्रमक.!

अन्यथा २६ जानेवारी रोजी नदिपात्रात करणार उपोषण ; वराड , सोनवडे ग्रामस्थांचा इशारा 

चौके :
मालवण आणि कुडाळ तालुक्याला जोडणाऱ्या कर्ली नदीवर बांधण्यात येणाऱ्या बहुप्रतिक्षीत वराड – सोनवडे पुलाचे काम चार वर्षे होत आली तरी पूर्ण झालेले नसुन काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. आज वराड सरपंच सौ. शलाका रावले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच , सोनवडे ग्रामस्थ यांनी पुलाच्या ठिकाणी भेट देउन पाहणी केली. त्यावेळी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी ना कामगार ना बांधकाम साहित्य अशी परिस्थिती निदर्शनास आली. त्यामुळे आक्रमक होत उपस्थित सर्व ग्रामस्थांनी पुलाच्या ठिकाणीच सभा घेत तीव्र आंदोलनाचा निर्णय घेतला.

येत्या २६ जानेवारीपुर्वी वराड सोनवडे पुलाचे उर्वरीत काम युद्धपातळीवर सुरु न झाल्यास २६ जानेवारीला वराड आणि सोनवडे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने रखडलेल्या कामाच्या ठिकाणी कर्ली नदिपात्रात उपोषणास बसणार असा ईशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी सरपंच शलाका रावले यांच्यासह श्री प्रमोद धुरी , श्री बबन पांचाळ तसेच वराड , सोनवडे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान १९ /१०/ २०१८ रोजी वराड सोनवडे पुलाच्या कामाचा कार्यांरंभ आदेश असून , त्यानंतर हा पुल १८ / ०४ /२०२० रोजी बांधून पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अद्याप फक्त ६०% च काम पूर्ण झाले असून अंदाजे ४०% काम अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे काम सुरू होऊन चार वर्षे पूर्ण झाली तरी पुलाचे काम अपुर्णावस्थेत असून सध्या प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी कोणतेही काम सुरू असलेले ग्रामस्थांना दिसले नाही त्यामुळे आक्रमक होत वराड – सोनवडे ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.यावेळी वराड सरपंच सौ. शलाका रावले यांनी रखडलेल्या वराड – सोनवडे पुलाच्या रखडलेल्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली आणि पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करावे असे प्रशासनाला आवाहन केले.