सहकारातील पी.एफ.डॉन्टस

संतोष वायंगणकर

कोकणात सहकार क्षेत्रात काम करण तसं सोपं नव्हतं. आणि आजही सोप काम नाही. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिवर लोकांचा विश्वास असावा लागतो. सैन्य दलातील सेवानिवृत्तीनंतर सिंधुदुर्गात आलेल्या पी.एफ.डॉन्टस यांनी राजकारणापेक्षा सहकार क्षेत्रात काम करायला सुरूवात केली. आणि एका-मागोमाग एक अशा सहकार क्षेत्रात संस्थांची स्थापना करत त्या यशस्विरित्या कशा चालू रहातील यासाठी त्यांनी जे प्रामाणिक प्रयत्न केले. त्यातून सिंधुदुर्गातील सहकार क्षेत्रात पी.एफ.डॉन्टस या नावाभोवती उभ्या राहिल्या गेल्या. पंचवीस-तीस वर्षात त्या पारदर्शी कारभाराने यशस्वीही झाल्या. सहकार क्षेत्रातील पी.एफ.डॉन्टस यांच वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. पी.एफ.डॉन्टस कोणताही गाजावाजा न करता सहकार क्षेत्रात सतत काम करत राहिले. सैन्यदलात नोकरी झाल्याने प्रामाणिकपणा आणि कामातील शिस्तशिरपणा होता. या उपजत गुणांमुळे त्यांच कार्य अधिक शिस्तबध्दतेने उभं राहू शकलं. खरंतर वृत्तपत्रांना पी.एफ.डॉन्टस हे नांव माहिती झालं ते सिंधुदुर्गातील शासकीय कर्मचाऱ्यांचे नेते म्हणूनच सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते र.ग.कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरकारी कर्मचारी संघटना स्थापन केली. राज्यसरकारी कर्मचाऱ्यांचे संघटन करतानाच डॉन्टस यांनी सिंधुदुर्ग जिल्हा राज्यसरकारी कर्मचारी पतसंस्था स्थापन केली. राज्यसरकारी कर्मचाऱ्यांचे संघटन आणि पतसंस्थेच्या माध्यमातून पतपुरवठा करत कर्मचाऱ्यांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्नही त्यांच्या माध्यमातून केला. माजी खासदार कर्नल सुधीर सावंत यांचे पी.एफ.डॉन्टस हे मित्र होते. परंतु पी.एफ.डॉन्टस राजकारणात फार कधी रमले नाही. पक्षिय राजकारणात पी.एफ.डॉन्टस काँग्रेसी विचारधारेचे होते. मात्र, पक्षिय राजकारणापेक्षा त्यांनी आपलं कार्यक्षेत्र सहकार निवडलं होतं. त्यामुळे अनेक संघटनात्मक कार्य आणि पतसंस्थांची निर्मिती त्यांच्या हातून होऊ शकली. शांत संयमी स्वभाव डोळयांवरचा चष्मा बऱ्याचदा हाफबुश शर्ट, पॅन्ट आणि काहीसा करारी भासणारा चेहरा परंतु उगाच कोणत्याही विषयावर वायफळ बडबड नाही की प्रसिद्धीची हाव नाही. फक्त प्रामाणिकपणे काम करत रहायच आणि जे काही उभं राहिल ते दिर्घकाळ टिकल पाहिजे यासाठीची त्यांची प्रामाणिक धडपड राहिली. माजी सैनिकांच संघटन करण्यात पी.एफ.डॉन्टस यांच योगदान मोठं आहे. माजी सैनिकांच केवळ संघटन करून ते थांबले नाहीत. तर माजी सैनिकांची सैनिक पतसंस्थेची स्थापना पी.एफ.डॉन्टसनी केली. सहकार क्षेत्रात अनेक संस्थांमध्ये कार्यरत असलेले पी.एफ.डॉन्टस कधीही वादग्रस्त ठरले नाहीत. याच कारण त्यांना कामातला प्रामाणिकपणा हेच म्हणता येईल. सैनिक नागरी सहकारी पतसंस्था शिस्तबद्धरित्या सहकार क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांनी कार्यरत केलेल्या पतसंस्थांमध्ये विश्वासार्हता निर्माण केली. कॅथॉलिक बांधवांसाठी कॅथॉलिक पतसंस्थेची स्थापना त्यांनी केली. कॅथॉलिक पतसंस्थाही योग्य पद्धतीने कार्यरत आहे. सहकार आणि प्रशासनातील उत्तम ज्ञान असलेल्या पी.एफ.डॉन्टस यांनी सहकार क्षेत्रात कार्यरत राहताना वेळ आणि शिस्तीला महत्व देत काम करीत राहिले. राज्यसरकारी कर्मचारी संघटनेचे नेतेपदी काम करतानाही कधीही त्यांनी टोकावरची भुमिका न घेता राज्य सरकारी कर्मचारी आणि प्रशासन यात समन्वय राखत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर होणारा अन्यायही दूर केला. जेव्हा कर्मचारी नेता म्हणून आक्रमक भुमिका घेण्याची वेळ आली तेव्हा पी.एफ.डॉन्टस यांनी आक्रमक नेतेगिरीही केली. जशी त्यांनी सैनिक पतसंस्था स्थापन केली तशी आंबोली येथे सैनिक स्कूल स्थापन केले. कोकणातील विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावर सैनिकी शिक्षण मिळावे या हेतूने आंबोली येथे सैनिक स्कूल सुरू आहे. गेल्याकाही वर्षात त्यांनी या सर्व संस्थामध्ये सक्रियता टाळली असली तरीही त्यांची उणीव सतत जाणवत राहणारी आहे. पी.एफ.डॉन्टस यांच्या पुढाकाराने या संस्था स्थापन झाल्या. या सर्व संस्था, तिथल व्यवस्थापन हे निटपणाने चालवणे त्या संस्थाशी संबंधित सर्वांना योग्य पद्धतीने सेवा देणे हे कर्तव्य ठरते. आंबोलीतील सैनिक स्कूलची शिस्त बिघडणार नाही तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे सैनिकी प्रशिक्षणात आवश्यक ते ज्ञान मिळावे यासाठी आता कार्यरत असणाऱ्या संचालकांची ती जबाबदारी आहे. त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व संस्थांचा कारभार खऱ्याअर्थाने पारदर्शी, सेवाभावी ठेवण्याचा प्रयत्न करणे हिच खरी पी.एफ.डॉन्टस यांना श्रद्धांजली ठरेल !