परतीच्या पावसाचे सावंतवाडीत ‘थैमान ‘

वीजांचा लखलखाट व गडगडाटासह मुसळधार

महावितरणची बत्ती गूल : जनजीवन विस्कळित

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरासह तालुक्यात बुधवारी पुन्हा एकदा परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले. विजांचा लखलखाट व ढंगाच्या प्रचंड गडगडाटासह सुमारे एक तास मुसळधार पाऊस कोसळला. गडगडाटामुळे महावितरणचा बत्ती गुल झाली. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले.

मंगळवारी दुपारच्या सुमारास सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्टयातील केसरी दाणोली भागात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने हाहाकार उडाला होता. या पावसामुळे कापणीला आलेल्या भात शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. भातशेती भुईसपाट झाल्यामुळे झाल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाला होता.

या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी पुन्हा एकदा अशाच प्रकारे सुमारे तासभर पाऊस कोसळल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले. तालुक्यात ग्रामीण भागात पावसाने दडी मारल्याने भात कापणीच्या कामाला नुकतीच सुरुवात करण्यात आली होती. मात्र, त्यातच सुरु झालेल्या परतीच्या पावसामुळे भात कापणी थांबवण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे.

दरम्यान, मंगळवारी देवसु – दाणोलीत झालेल्या भात शेती नुकसानीची सावंतवाडीचे नायब तहसीलदार मनोज मुसळे यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांना दिले. त्यामुळे अहवाल दिल झालेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.