झापडे -कांटे -कोट रस्त्यावरील पुलाचे काम मार्गी लावणाऱ्याचे पाठीशी ठामपणे राहणार

कांटे-कोट पंचक्रोशीतील ग्रामविकास मंडळे आणि वाडी प्रमुख यांचा निर्धार

लांजा (प्रतिनिधी) तालुक्याच्या पश्चिम भागातील झापडे कांटे-कोट सह पंचक्रोशीतील गावांना जोडणाऱ्या आणि दळणवळणासाठी महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या बेनी नदीवरील पुलाचे काम मार्गी लावणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार कांटे झापडे कोट पंचक्रोशीतील ग्रामविकास मंडळे आणि वाडी प्रमुख यांनी घेतला आहे.

याबाबत कोट गावचे माजी सरपंच शांताराम तथा आबा सुर्वे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. याबाबत त्यांनी सांगितले की, सदर झापडे-कांटे-कोट या रस्त्यावरील पुऋ व्हावा या मागणीसाठी दिनांक एक मे रोजी आपण ग्रामस्थांसह उपोषण छेडले होते. या उपोषणाला लांजा राजापूर तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड व पदाधिकारी यांनी पाठिंबा दर्शवला होता. यावेळी आमदार राजन साळवी त्याचप्रमाणे पालकमंत्री उदय सामंत यांनी सदरच्या पुलाचे काम मार्गी लावण्याबाबत लेखी पत्र दिलेले आहे. २०२४ च्या आर्थिक बजेटमधून सदरच्या पुलाचे काम पूर्ण केले जाईल असे पत्र दिले आहे. आणि म्हणूनच ज्या लोकप्रतिनिधींकडून सर्वप्रथम या पुलाच्या कामाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल त्याच्याच पाठीशी ठामपणे राहण्याचा व त्यांच्या पक्षाला मतदान करण्याचा निर्धार हा झापडे कांटे- कोट गावातील ग्रामविकास मंडळे (ग्रामीण आणि मुंबई) आणि वाडीप्रमुख यांनी घेतला असल्याचे आबा सुर्वे यांनी सांगितले.

याबाबतची बैठक जाकरदेवी ग्रामदेवता मंदिर कांटे येथे पार पडली होती .या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे माजी सरपंच शांताराम सुर्वे यांनी सांगितले. आणि म्हणूनच राज्यकर्त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सदरच्या कांटे-कोट येथील बेनी नदीवरील पुलाचे काम तातडीने मार्गी लावावे अशी मागणी शेवटी शांताराम सुर्वे यांनी केली आहे.