सागर खंडागळेला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी

सूरज पाटील प्रकृती अस्वस्थामूळे जिल्हा रुग्णालयात दाखल

सावंतवाडी । प्रतिनिधी : फ्लॅट विक्री प्रकाणातील फसवणूकीच्या गुन्ह्यात संबंधित बिल्डरकडून एक लाखाची लाच स्वीकारल्या प्रकरणी रायगड लाच लुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे याला शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता त्याला सोमवार पर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तर या गुन्ह्यातील दुसरा संशयित पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील प्रकृती अस्वस्थामुळे जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत आहे. मात्र, लवकरच त्याला ताब्यात घेऊ अशी माहिती जिल्हा लाच लुचपत विभागाचे उपविभागीय अधीक्षक अरुण पवार यांनी दिली. सध्या पोलीस कोठडीत असलेल्या सागर खंडागळे याची कसून चौकशी सुरू असून या प्रकरणी अन्य कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.