मसुरे | प्रतिनिधी :मालवण तालुक्यातील वेरली सडेवाडी येथील रहिवासी तथा आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविका सौ.सायली उर्फ नयना सदाशिव चव्हाण (४५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने सोमवारी निधन झाले. सायली चव्हाण या मागील दहा वर्षे आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे अंतर्गत वेरली येथे आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत होत्या. शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजना गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी त्या नेहमीच पुढे होत्या. वेरली येथे होणाऱ्या सर्व धार्मिक सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमात त्या नेहमीच सक्रियपणे सहभागी असायच्या. वेरली परिसरात व आरोग्य विभागात त्यांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध होते. आरोग्य विभागाबरोबरच ग्रामपंचायत व अंगणवाडी या विभागातही त्यांचे नियमित सहकार्य होते. दरम्यान सोमवारी घरातील जेवणानंतर कपडे धुवत असताना त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. याबाबत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मंगळवारी सकाळी वेरली येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आरोग्य विभाग तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पोलीस ठाण्यात सायली यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, आई, भाऊ, भावजई, दीर, जाऊ, मामा, मामी, मावशी, मावशे, बहिणी, भाचे, पुतण्या असा मोठा परिवार आहे. येथील वारकरी सांप्रदायिक भजनी बुवा सदाशिव उर्फ शिवा चव्हाण यांच्या त्या पत्नी, रिक्षा व्वसायिक रवींद्र चव्हाण यांच्या त्या भावजई, येथील भजनी बुवा हरेश तेंडोलकर यांच्या त्या भगिनी तर महिला बचत गटाच्या सीआरपी आर्या तेंडोलकर यांच्या त्या नणंद होत.











