लांजा Update : पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने शोधला बेपत्ता महिलेचा खुनी

लांजा | प्रतिनिधी : लांजा पोलीस ठाणे हद्दी मधून दिनांक 29/07/2023 रोजी एक विवाहित महिला सौ. वैशाली चंद्रकांत रांबाडे (48 वर्षे) ही आपल्या कोंडये, रांबाडेवाडी लांजा येथील राहत्या घरातून बेपत्ता झाली होती. या बाबत लांजा पोलीस ठाणे येथे तिच्या नातेवाइकांनी चौकशी करून 31/07/2023 रोजी तक्रार दिल्याने, नापत्ता रजि. 17/2023 दाखल करण्यात आला.

या बेपत्ता महिलेच्या तपासा मध्ये तिच्याच गावात राहणारा एक इसम- राजेंद्र गोविंद गुरव याने तिला कुठेतरी नेऊन ठेवल्याबाबत पोलीस निरीक्षक श्री. दादासाहेब घुटुकडे यांनी तपासामध्ये निष्पन्न केले व सदर बाबत लांजा पोलीस ठाणे येथे भा.द.वि संहिता कलम 365, 366 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपासा मध्ये आरोपी राजेंद्र गोविंद गुरव रा. कोंडये, रांबाडेवाडी याच्याकडे कसून विचारपूस करता अपहरीत महिलेचा खून केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे तसेच आरोपीने आपण खूनाचा गुन्हा केलेबाबत कबुली दिल्याने त्याच्यावर भा.द.वि संहिता चे कलम 364, 376, 302 व 201 ही वाढीव कलमे लावण्यात आलेली आहेत.
सदर महिलेचा ज्या ठिकाणी आरोपी राजेंद्र गोविंद गुरव रा. लांजा याने खून करून मारून टाकलेले होते त्या ठिकाणावरून लांजा पोलीसांमार्फत दोन पंचांसमक्ष मृत देहाचे अवशेष ताब्यात घेण्यात आलेले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी, लांजा श्री. यशवंत केडगे हे करीत असून, सदर गुन्ह्याच्या ठिकाणी मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी यांनी लागलीच भेट देऊन उचित मार्गदर्शन केलेले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.