रत्नागिरी : ‘कलांगण संगमेश्वर’तर्फे आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत माखजन इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी निमिष मिलिंद मोने याने प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.बुरंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालयात आयोजित या स्पर्धेत आठवी ते दहावीच्या २६ विद्यार्थ्यांनी भाग घेतला.देवरुखच्या अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मिडीयम स्कूलचा गुंजन आशिष खवळे याने द्वितीय, तर न्यू इंग्लिश स्कूलच्या चिन्मयी अनंतकुमार मोघे हिने तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धकाला उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल ठेवलेला खास पुरस्कार माखजन इंग्लिश स्कूलचे गणेश सीताराम शिंदे यांना देण्यात आला.
बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शांताराम भुरावणे, राजाभाऊ गर्दे , सचिव शरद बाईत , मुख्याध्यापक वीरकर आणि स्पर्धेच्या समन्वयक व प्रसिद्ध अभिनेत्री-निवेदिका संपदा जोगळेकर कुळकर्णी , यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.स्पर्धेसाठी ‘समाज माध्यमांचे मोहजाल…’, ‘काय ही पिढी?’, ‘इस्रोची वाटचाल -सायकल ते चांद्रयान ३,’ आणि ‘वर्ष श्री धान्याचे (मिलेट्स)’ हे चार विषय देण्यात आले होते.चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका मेधा लोवलेकर आणि सुरेश दामोदर गद्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. संगीता जोशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.










