वेताळ प्रतिष्ठान चे सलग २३ वे रक्तदान शिबीर : ३६ रक्तदात्यांनी केले रक्तदान..
वेंगुर्ले l प्रतिनिधी :वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, छत्रपती मित्र मंडळ, तुळस आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला आयोजित सलग २३ व्या रक्तदान शिबिरास दात्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस(तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्था मुंबई,बहुउद्देशीय सभागृह) येथे रक्तपेढी सावंतवाडी च्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्त्या अर्चनाताई घारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि सामजिक कार्यकर्ते प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तुळस सरपंच रश्मी परब,वाचनालय चे अध्यक्ष सगुण माळकर, ग्रा.प. सदस्य जयवंत तुळसकर, वैधकीय अधिकारी डॉ. एडगे, प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा.सचिन परुळकर, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग उपाध्यक्ष महेश राऊळ, छत्रपती चे अध्यक्ष अवधूत मराठे, ॲलिस्टर ब्रिटो, प्रकाश परब, श्रीकृष्ण कोंडूस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
आज सिंधुदुर्ग मद्ये बहुआयामी कार्यक्रम करणारी वेताळ प्रतिष्ठान ही अग्रणी संस्था असून त्यांनी जे लोकोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले आहेत त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे,आजपर्यंत त्यांनी २३ रक्तदान शिबिरे यशस्वी पार पाडली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो असे मनोगत प्रसन्ना देसाई यांनी व्यक्त केले.
सामाजिक कार्यकर्त्या अर्चनाताई घारे यांनी मनोगत व्यक्त करताना रक्तदान सारख्या उपक्रमाचे आयोजन करून वेताळ प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकी जपत आहे. सद्यस्थितीत युवक समाजात दिशाहीन वावरत असताना प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावातील तरुण एकत्र येत स्वच्छता, वृक्षारोपण, गडकिल्ले संवर्धन, व्यावसायिक प्रशिक्षणे अशा समाजहिताचे उपक्रम राबवित आहे. सामाजिक उपक्रमासह कला, क्रीडा व शैक्षणिक उपक्रमातही योगदान उल्लेखनीय आहे. अशा प्रकारे आजच्या युवा वर्गाला दिशा देणारे आदर्शवत काम सर्वांना प्रेरणा देणारे आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी सरपंच रश्मी परब यांनी प्रतिष्ठान विविध उपक्रमांचा आढावा घेत उपक्रमांस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत ३६ दात्यांनी रक्तदान केले.शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान आणि छत्रपती मंडळ च्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन गुरुदास तिरोडकर व आभार किरण राऊळ यांनी मानले.