वैभववाडीत त्यांनी केलेल्या विकासकामांची होऊदे चर्चा..
तालुक्याच्या विकासात उबाठाचे योगदान शून्य: रावराणे यांची सडकून टीका
नरेंद्र कोलते : वैभववाडी l निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उबाठा सेनेचे नेते भाजपावर टिका करत आहेत. त्यांना चर्चाच करायची असेल तर कार्यतत्पर आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी तालुक्यात केलेल्या विकास कामांची करावी. असे रोखठोक मत भाजपा जिल्हा युवा चिटणीस संताजी रावराणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिले आहे. वैभववाडी तालुका विकासात उबाठा पक्षाचा काहीच संबंध नाही. तालुक्याच्या विकासावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकारही नाही. असे रावराणे यांनी म्हटले आहे. उबाठा युवा सेना पदाधिकारी सुशांत नाईक यांनी वैभववाडी शहरात भाजपा च्या विरोधात पत्रक वाटली होती. संताजी रावराणे यांनी ही पत्रके वाटून उत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या पत्रकामध्ये आमदार नितेश राणे व भाजपा पक्षाच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या विकास कामांची माहिती प्रसिद्ध केली आहे.
वैभववाडी तालुक्यात सुसज्ज ग्रामीण रुग्णालय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून उभारले आहे. पंचायत समिती इमारत, तहसील कार्यालय इमारत, भुमिअभिलेख इमारत ही कार्यालये श्री राणे साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाली आहेत. वैभववाडी शहरातील मुख्य संभाजी चौकाचे सुशोभीकरण आमदार नितेश राणे यांनी पूर्ण केले आहे. तरळे – गगनबावडा रस्त्यासाठी 249 कोटी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांनी दिले आहेत. वैभववाडी शहरांमध्ये भव्य महाराणा प्रतापसिंह कलादालन आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून उभे राहिले आहे. वैभववाडी शहरातील सुलभ शौचालय आमदार नितेश राणे यांनी स्वखर्चातून बांधून नागरिकांची गैरसोय दूर केली आहे. येथील मुख्य चौक सुशोभीकरण व सेल्फी पॉइंट आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून उभा राहिला आहे. वैभववाडी शहरातील जनतेच्या सेवेसाठी 55 लाखाचा अग्निशामक वाहन नव्याने तालुक्यात दाखल झाले आहे. शहरातील जनतेच्या सेवेसाठी घंटागाडी, ट्रॅक्टर वाहनासाठी 32 लाख प्राप्त झाले आहेत. काही दिवसातच या वाहनांचा लोकार्पण होईल. न.पं. नूतन इमारतीसाठी दोन कोटी, सुसज्ज गार्डन एक कोटी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून निधी प्रस्तावित आहे. उबाठाचे खासदार विनायक राऊत यांनी तालुक्याच्या विकासासाठी कोणते योगदान दिले. फुटकी कवडी तरी दिली का? याचीही चर्चा सेना पदाधिकाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे. असे संताजीराव यांनी पत्रकात म्हटले आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उबाठा चे नेते तालुक्यात फिरत आहेत. तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. जनताच विरोधकांना निवडणुकीत उत्तर देईल. असे रावराणे यांनी म्हटले आहे.












