रत्नागिरी : रत्नागिरी शहराजवळील ,कर्ले गावामधील, जिल्हापरिषदेच्या पूर्ण प्राथमिक मराठी शाळेला, दिल्लीतील सृजन संपदा फाउंडेशकडून संगणक संच देण्यात आला. या देणगीबद्दल सृजन संपदाच्या सौ नयना सहस्रबुद्धे यांचे शालेय समितीकडून खास आभार मानण्यात आले.ही देणगी मिळविण्यासाठी श्री वरुण राजीव लिमये यांनी खास प्रयत्न करून सृजन संपदा आणि शाळेसोबत समन्वय साधल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देण्यात आले.. खास उल्लेखनीय म्हणजे २०१४ -१५ चे दरम्याने खालवलेल्या पटसंख्येमुळे बंद होण्याची भीती असलेल्या या पूर्ण प्राथमिक शाळेची पटसंख्या स्थानिक ग्रामस्थ आणि शिक्षकांचे समन्वयामुळे वाढत आहे. पालक शिक्षक संघ तसेच ग्रामपंचायत यांचे सक्रिय सहकार्य आणि मुख्याध्यापक श्री नितीन गांवकर यांचे समन्वयातून विद्यार्थी प्रगती करीत आहेत असे ग्रामपंचायत सदस्य श्री मिलींद हातफले यांनी आवर्जून नमूद केले. येथील नाईक यांचे रत्ना सी फूडस कंपनीने वाय फाय कनेक्शनही दिलेले असल्याने नविन डेस्कटॉप वर उत्साही विद्यार्थी गुगल वर सर्फिंग करुन शैक्षणिक माहिती मिळवित असल्याचे मुख्याध्यापक श्री गावकर यांनी नमूद केले आहे.
माजी विद्यार्थ्यांचे सहकार्याने शाळेचा निरंतर विकास करण्याचा येथील ग्रामस्थांचा आणि पालक शिक्षक संघाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.शाळेच्याच आवारात असलेल्या अंगणवाडीलाही सौ मुग्धा राजीव लिमये यांचे देणगीतून नुकतेच कारपेट बसविण्यात आले,त्याबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले. अंगणवाडीतील विद्यार्थी पुढे मराठी शाळेला मिळत असल्याने पटसंख्या पुरेशी रहात असते. मातृभाषेत शिक्षण घेणे विद्यार्थ्यांचे संतुलित बौद्धीक विकासात महत्वाचे असल्याचे तत्व जागतिक पातळीवर मान्य असल्याने ,कर्ले गृप ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांनी आपली मुले याच शाळेत पाठवावी अशी आग्रहाची विनंती व्यवस्थापन कमिटीने केली असून जिल्हा परिषदेचे सहकार्य आणि लोकसहभागातून शाळा अद्ययावत ठेवण्याचा विश्वासही व्यक्त केला. ग्रामीण भागातील शैक्षणिक विकासासाठी शक्य ते योगदान देण्याचा मानस या कार्यक्रमाचे समन्वयक श्री.वरुण लिमये यांनी व्यक्त केला.










