साटवली गावात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे विजेचा खेळखंडोबा

शासकीय कार्यालयांसह नळपाणी योजनेवर परिणाम

लांजा( प्रतिनिधी) तालुक्यातील साटवली गावात गेल्या पंधरा दिवसापासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे .याचा थेट परिणाम हा शासकीय कार्यालयातील कामकाजा बरोबरच साठवली नळपाणी योजनेवर होत असून पावसाळ्यात ग्रामस्थांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे .
गेल्या पंधरा दिवसापासून साटवली गावात विजेचा हा खेळखंडोबा सुरू आहे. दिवसा बरोबरच रात्री अपरात्री केव्हाही वीज गायब होत आहे .विजेचा कडकडाट किंवा पाऊस यावेळी लाईट जाणे हे मान्य केले असले तरी इतर वेळी दिवसातून अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे .रात्री देखील वीज गायब होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. दिवसा सातत्याने खंडित होणाऱ्या विजेचा परिणाम हा या ठिकाणी असणाऱ्या बँका, शासकीय कार्यालय यांच्या कामकाजावर होत आहे .ग्रामस्थांना विविध दाखले किंवा अन्य शासकीय कामे करताना अडथळा निर्माण होत आहे .

 

 

त्याचप्रमाणे सातत्यपूर्ण खंडित विज पुरवठया मुळे त्याचा थेट परिणाम हा साटवली ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेवर होत असून पावसाळ्यात ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. खंडित विजेमुळे कधी कधी दोन दोन दिवस पाणी येत नसल्याने ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता ट्रान्सफॉर्मर गेला आहे किंवा ट्रायल बेस चालू आहे अशा प्रकारची विविध उत्तर देऊन ग्रामस्थांची बोलवण केली जात आहे .
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सातत्यपूर्ण होणाऱ्या खंडित विज पुरवठयाची दखल घेत तातडीने हा विज पुरवठा सुरळीत होणारी दृष्टीने कार्यवाही करावी अशी मागणी साटवली गावातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण, अविनाश पावसकर ,प्रसाद तरळ व ग्रामस्थवर्ग यांनी केली आहे.