सोबत असलेले आमदार टिकवून ठेवण्यासाठीच जयंत पाटील यांची धडपड : चंद्रशेखर बावनकुळे

सावंतवाडीत ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळेल उमेदवारी

सावंतवाडी । प्रतिनिधी : राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे कोणतेही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात नाहीत. त्यामुळे आपल्या सोबत असलेले आमदार टिकून राहिले पाहिजेत यासाठीच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तशी वक्तव्ये करीत आहेत. मात्र, वेळ आल्यावर सगळ्यांना कळेल, असे सूचक वक्तव्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

सावंतवाडीत प्रदेश भाजपच्या वाॅर रूम कार्यालयाचे उद्घाटन गुरूवारी रात्री प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, माजी उपसभापती शितल राऊळ, मंदार कल्याणकर, प्रथमेश तेली आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत २२ जागांची मागणी केली आहे. लोकशाहीत कोणीही मागणी करू शकतात. पण या सर्वाचा निर्णय भाजपचे केंद्रिय निवड मंडळ घेणार आहे असे सांगत तिकिट वाटप सर्वाना विश्वासात घेऊनच केले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून भाजप कुणाला उमेदवारी देणार असे विचारले असता ज्याच्या नशीबात असेल त्याला उमेदवारी मिळेल असे सांगत त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटांचे काही आमदार आमच्या सर्पकात असल्याचे वक्तव्य केले होते.त्यावर बावनकुळे यांनी ही भाषा फक्त आहेत ते आमदार टिकून राहिले पाहिजेत यासाठीच आहे. मात्र, वेळ आल्यानंतर सर्वकाही कळेल असे सूचक विधान बावनकुळे यांनी यावेळी केले.