दोडामार्गमध्ये गोवा बनावटीच्या दारुसह ९ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

इन्सुली एक्साइजची कारवाई

बांदा : प्रविण परब
दोडामार्ग तिलारी मार्गावर कोनाळ ग्रामपंचायत नजीक इन्सुली एक्साइजने गोवा बनावटीची दारु जप्त केली. या कारवाईत २ लाख ७० हजार ९०० रुपयांच्या दारुसह ७ लाखांचा टेम्पो असा एकूण ९ लाख ७० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी लक्ष्मण सातेरी पाटील (५१, रा. किनये, बेळगांव) याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

गोव्यातून दोडामार्ग मार्गे बेळगावला दारु वाहतूक होणार असल्याची माहिती इन्सुली एक्साइजला मिळाली होती. त्यानुसार कोनाळ ग्रामपंचायत नजीक सापळा रचण्यात आला होता. गोव्यातून येणारा टेम्पो (केए २२ सी ९३९८) तपासणीसाठी थांबविण्यात आला. प्रथमदर्शनी टेम्पो रिकामी असलयाचे दिसत होते. मात्र अधिक तपासणी केली असता चोरकप्प्यात दारुसाठा आढळून आला.

सदर कारवाई एक्साइजचे प्रभारी अधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय मोहिते, दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, प्रदीप रास्कर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान प्रसाद माळी, रणजित शिंदे यांच्या पथकाने केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप रास्कर करीत आहेत.