मुलांच्या खेळासाठी आरक्षित केलेली जागा तब्बल 23 वर्ष ताब्यात न घेता पडून
सामाजिक कार्यकर्ते अमेय परुळेकर यांनी उघड केला रत्नागिरी नगर परिषदेचा अजब कारभार
रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरी नगर परिषदेच्या कारभाराचे अजब किस्से हळूहळू उघड होताना दिसत आहेत. तब्बल 23 वर्षांपूर्वी मुलांच्या खेळासाठी आरक्षित केलेली जागा नगर परिषदेने अद्याप पर्यंत ताब्यातच घेतली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या जागेजवळच एक प्रशाला असूनही त्या मुलांना या जागेच उपयोगच झालेला नाही. रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते अमेय परुळेकर यांनी माहितीच्या आधाराने हा प्रकार उघडकीस आणला असून त्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरी शहरांमध्ये आरक्षित केलेल्या भूखंडांची माहिती घेण्यासाठी अमेय परुळेकर यांनी रत्नागिरी नगर परिषदेकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. यामध्ये आरक्षित जमीन किती गुंठे आहे? या जमिनीचा आरक्षण किती साली झालं? आरक्षण जमिनीचा सर्वे नंबर आणि पत्ता मिळावा, आरक्षण कोणत्या कारणासाठी झालं? ज्या कारणासाठी आरक्षण झालं त्यासाठी सदर भूखंड वापरला गेला का? असल्यास कुठल्या तारखेपासून आरक्षित भूखंडाचा वापर सुरू होऊन वापर बंद पडला होता का?, भूखंड आरक्षित झाला त्यावेळेला नगराध्यक्ष कुठल्या पक्षाचा होता आणि त्याचं नाव काय?, भूखंड आरक्षित झाला त्यावेळी रत्नागिरी नगरपरिषदेत कुठल्या पक्षाची सत्ता होती?, भूखंड आरक्षित झाल्यावर तो भूखंड विना वापर पडून असेल तर त्याची साफसफाई आणि देखरेख रत्नागिरी नगरपरिषद करते का? आणि असल्यास महिना किती खर्च होतो?, आरक्षित जमीन कुठल्या प्रकारची आहे? उदा. पड, खराबा किंवा बिनशेती प्रकारची आहे का? अशा आशयाची माहिती अमेय परुळेकर यांनी रत्नागिरी नगर परिषदेकडे ऑक्टोबर 2021 रोजी मागवली होती. मात्र, आपण मागवलेली माहिती मोघम स्वरूपाची असून कोणते आरक्षण आहे त्याची माहिती दिली नाही, असं कारण सांगून हा अर्ज निकाली काढण्यात आला होता.
त्यानंतर परुळेकर यांनी 9 डिसेंबर 2021 रोजी रत्नागिरी शहरातील शेरे नाका येथील शिवाजी हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर श्री. मलुष्टे यांच्या घराला लागून असलेल्या जमिनीची माहिती नगरपरिषदकडे मागवली होती. त्यानंतर माहितीच्या अधिकारात नगर परिषदेने दिलेल्या माहितीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नगर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार 19 गुंठे असलेली श्री. मलुष्टे यांच्या घराशेजारील ही जागा 27 एप्रिल २००० रोजी ‘मुलांचे खेळाचे मैदान’ या कारणासाठी आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, ऑक्टोबर 2023 पर्यंत या भूखंडाचा नगरपरिषदेने ताबा घेतलेला नाही. भूखंड आरक्षित होऊन जर तो विना वापर पडून असेल तर त्या जमिनीची साफसफाई होते का? होत असल्यास वर्षातून किती वेळा होते? त्यासाठी वर्षाला किती रक्कम खर्च होते? असे प्रश्न अशी माहिती श्री. परुळेकर यांनी विचारले असता अशा प्रकारची कोणतीच तरतूद नाही, असे उत्तर नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आलं. तर आरक्षित झालेली जमीन नेमकी पड, खराबा की बिनशेती स्वरूपाची आहे या प्रश्नाला नगर परिषदेकडून ‘माहिती उपलब्ध नाही’ असे धक्कादायक उत्तर देण्यात आलं आहे. गेली 23 वर्ष रत्नागिरी शहरातील मोक्याच्या ठिकाणांची ही जागा तशीच पडून असून
ती भर वस्तीत आहे. या जागेच्या आजूबाजूला लागुनच घरे असून जागेचा वापर नसल्याने तिथे मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा रहिवाशांना धोका आहे. तर या जागेवर खेळाचे मैदान झाले असते तर नजीकच असलेल्या शिवाजी हायस्कूलच्या विध्यार्थ्यांना त्याचा वापर करता आला असता. मात्र हीच नव्हे तर अशा अन्यही नगरपरिषदेच्या आरक्षित जागा विनावापर पडून असण्याची शक्यता परुळेकर यांनी व्यक्त केली आहे.












